बहीण-भावाचा धुमाकूळ: पुण्यासह अनेक जिल्ह्यांत चोरी; आता असे अडकले जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 19:53 IST2025-01-05T19:52:49+5:302025-01-05T19:53:09+5:30
पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींनी पुणे येथील सहकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत व सोलापूरच्या बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराफी पेढी दुकानात चोरी केल्याची कबुली दिली.

बहीण-भावाचा धुमाकूळ: पुण्यासह अनेक जिल्ह्यांत चोरी; आता असे अडकले जाळ्यात
Nashk Crime: नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर येथील पु. ना. गाडगीळ अॅण्ड सन्स या सराफी पेढीमध्ये संशयास्पद वावरणाऱ्या बहीण-भावाला उपनगर पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांचेकडून अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. सोलापूर व पुणे शहरातील सराफी पेढीमधून हात चलाखीने सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्याकडून सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केल्याचे आल्याचे पोलिस आयुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले.
शिखरेवाडी येथील स्टार झोन मॉलमधील पु. ना. गाडगीळ अॅण्ड सन्स या सराफी पेढीमध्ये गेल्या महिन्यात १७ डिसेंबर रोजी दोन सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याचा प्रकार काही दिवसानंतर उघडकीस आला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासल्यानंतर इसम व त्याच्यासोबत असलेल्या महिलेने सुमारे अडीच लाख रुपये किमतीच्या तीन तोळ्याच्या सोन्याच्या दोन बांगड्या चोरल्याचे दिसून आले. संशयित चंद्रकांत विनोदभाई परमार (५५), पूनम कमलेश शर्मा (५७) रा. स्वामीनारायण, स्वामी पार्क, अहमदाबाद गुजरात या बहीणभावास अटक करण्यात आली होती. उपनगर पोलिस ठाण्यात आणले. उपनगर पोलिसांनी त्यांची कसन चौकशी केली असता त्यांनी नाशिकरोड येथील गाडगीळ अॅण्ड सन्स या दुकानात १५ दिवसांपूर्वी दोन सोन्याच्या बांगड्या चोरल्याची कबुली दिली.
दोघा संशयित बहीणभावांना नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता सहा दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आल्याचे मोनिका राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, पोलिस कोठडीमध्ये असलेल्या दोघा संशयित बहीणभावांची उपनगर पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी पुणे येथील सहकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत व सोलापूरच्या बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराफी पेढी दुकानात अशाच पद्धतीने हातचलाखीने सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली देत ते दागिने गुजरात राज्यातील बडोदरा येथील सोन्याचे काम करणाऱ्या कारागिरास विकल्याची माहिती दिली.