बेमोसमी पावसाने नाशिककर गारठले

By Admin | Updated: February 28, 2015 23:44 IST2015-02-28T23:44:05+5:302015-02-28T23:44:14+5:30

बेमोसमी पावसाने नाशिककर गारठले

Bamosami rains caused by Nashikkar | बेमोसमी पावसाने नाशिककर गारठले

बेमोसमी पावसाने नाशिककर गारठले

नाशिक : फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून उन्हाळ्याकडे सुरू झालेली वाटचाल आणि वातावरणात पसरलेला उष्मा अचानक आलेल्या पावसामुळे थंडीत परावर्तीत झाला आणि नाशिककरांनी रात्री पुन्हा थंडी अनुभवली. या थंडीची तीव्रता राज्यात सर्वाधिक होती.
जानेवारीच्या मध्यापासून वातावरणातील उष्मा वाढू लागला होता. हे तपमान २० अंशापर्यंत पोहोचले होते. आता उन्हाळा कडाक्याचा पडणार आणि वैशाख वणव्याची झळ पोहोचणार, असा अंदाज वर्तविला जात असतानाच अचानक आलेल्या बेमोसमी पावसाने त्रेधातिरपीट उडाली. सकाळपासूनच आलेल्या ढगाळ वातावरणामुळे दिवसभर थंडीची जाणीव होत होती आणि पाऊस पडेल, असा अंदाज होता. अखेर दुपारी ४ च्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ झाली. रस्त्यावरील विक्रेत्यांचे हाल झाले. अनेक रस्त्यांची कामे सुरू असल्याने ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली होती. शहरासह उपनगरांमध्येही झालेल्या पावसाने चाकरमान्यांची, तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. शाळा सुटण्याच्या वेळेस सुरू असलेल्या पावसामुळे विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनाने घर गाठावे लागले, तर अनेक विद्यार्थी भिजतच घरी परतले. कार्यालये सुटल्यानंतर कर्मचाऱ्यांनाही ओलेचिंब होऊन घर गाठावे लागले. त्यामुळे खासगी वाहनांना मागणी वाढली होती.
राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये हजेरी लावली. यामुळे आंब्याचा मोहोर आणि गव्हाचे काही प्रमाणात नुकसान झाले. गुजरात सीमेवर तसेच कच्छ परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील बहुतांश भागात पावसाचे वातावरण निर्माण झाले असून, येते एक-दोन दिवस हे वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रात्री दहानंतर पावसाचा वेग अधिकच वाढला. त्यामुळे गारठ्यात भर पडली. (प्रतिनिधी)

Web Title: Bamosami rains caused by Nashikkar