Ashok Kharat: ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्यासह तिघांची चौकशी, बंगल्यावरील 'त्या' कर्मचाऱ्यांचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 16:37 IST2026-03-23T16:37:11+5:302026-03-23T16:37:44+5:30
Ashok Kharat Latest News: भोंदू अशोक खरात याचे बलात्काराचे कारनामे समोर आले. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून केला जात असून, मंदिरासह बंगल्यातील हालचालींची पोलिसांनी माहिती घेतली.

Ashok Kharat: ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्यासह तिघांची चौकशी, बंगल्यावरील 'त्या' कर्मचाऱ्यांचाही समावेश
Ashok Kharat News Marathi: तथाकथित हायप्रोफाइल ज्योतिषी अशोक खरात याचे आता रोज नवनवे कारनामे समोर येत आहेत. एसआयटीसह स्थानिक पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. पथकाने रविवारी (२२ मार्च) मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिराचा पुजारी, खरातच्या आलिशान बंगल्याचा वॉचमन आणि व्यवस्था पाहणारा कर्मचारी यांना नाशिकला बोलावून चौकशी केल्याचे वृत्त आहे. खरात याच्या मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांसह जमीन खरेदी-विक्रीशी संबंधित व्यवहारात सहभागी लोकही चौकशीच्या रडारवर आले आहेत.
मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरासह अशोक खरात याच्या आलिशान बंगल्यात होणाऱ्या हालचालींविषयी एसआयटीच्या पथकासह नाशिकपोलिसांनी मंदिराचा परप्रांतीय पुजारी तिवारी याच्यासह बंगल्याचा वॉचमन व एक कर्मचारी यांच्याकडून अधिक माहिती घेतल्याचे समजते.
मंदिर आणि बंगल्यावर कोण-कोण यायचे?
मंदिराचा परप्रांतीय पुजारी गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास आहे. त्यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांसह व्हीआयपी भक्तांची त्याच्याकडे माहिती असू शकते.
ईशान्येश्वर मंदिर आणि खरात याचा बंगला मिरगाव गावापासून सुमारे अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे बंगल्यावर काही अपवाद वगळता अन्य कोणाचा फारसा राबता नाही. मंदिर आणि बंगल्यात कोण-कोण येत होते अथवा कोण येऊन गेले, याबाबतची चौकशी पथकाने केल्याचे समजते.
मंदिरात श्रावण महिना, महाशिवरात्र व गुरुपौर्णिमा वगळता इतर दिवशी फारशी गर्दी नसते. मंदिर व बंगल्याच्या परिसरात संपूर्ण शेती आहे, त्यामुळे या ठिकाणी कोण आले आणि कोण गेले, याबाबत परिसरात फारशी माहिती स्थानिकांना, नागरिकांना नसायची.
चौकशी करून तिघांना सोडले
खरात याचेही या ठिकाणी फार कमी वास्तव्य असायचे. रविवारी किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी तो या ठिकाणी येत असे. मंदिर परिसरात खरात याच्या उपस्थितीत काही धार्मिक विधी केले जात असत. त्यावेळी त्याच्यासमवेत पुजारी असायचा.
मागील काही वर्षापासून मंदिराची स्वच्छता आणि देखभालीचे काम सांभाळणारा कर्मचारी, तसेच फार्म हाऊसची रखवाली करणारा वॉचमन या तिघांकडून अधिक माहिती मिळते काय, यादृष्टीने चौकशी करण्यात येऊन त्यानंतर त्यांना सोडण्यात आले. तत्पूर्वी या तिघांनी या चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी वावी पोलिस ठाण्यात तोंडी खबर दिल्याचे सांगण्यात आले.