गोदा युनियनकडून शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार

By Admin | Updated: September 6, 2016 22:32 IST2016-09-06T22:31:54+5:302016-09-06T22:32:36+5:30

गोदा युनियनकडून शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार

Agricultural award to farmers from Goda union | गोदा युनियनकडून शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार

गोदा युनियनकडून शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्थेच्या वतीने कार्यक्षेत्रातील कर्तृत्ववान शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
१९७८ साली स्थापन झालेल्या गोदा युनियनचा सहकार क्षेत्रात राज्यात दुसऱ्या क्रमांकाची संस्था म्हणून लौकिक आहे. विविध योजना राबवून सभासदांचे जीवनमान उंचावण्यासाठी संस्थेने मोठे काम केले आहे. याचाच एक भाग म्हणून विविध अडचणींचा सामना करताना शेतीत नवनवे प्रयोग राबविणाऱ्या कर्तृत्ववान शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार देत कौतुकाची थाप मारली आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे व संस्थापक बरकत सोहील यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष लक्ष्मण सांगळे, संचालक मंडळाने सुरू केलेल्या या उपक्रमाचे सभासदांकडून स्वागत होत आहे.
निवड समितीने या कृषी पुरस्कारासाठी वडझिरे येथील तुकाराम राजेंद्र शेळके (प्रथम), नायगाव येथील दिगंबर भागुजी कातकाडे (द्वितीय) तर देशवंडी येथील नवनाथ सुलाजी बर्के (तृतीय) या शेतकऱ्यांची निवड केली. माजी मंत्री दिघोळे यांच्या हस्ते या शेतकऱ्यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. जोगलटेंभी येथील तरुण शेतकरी विशाल सुदाम तांबे, नायगाव येथील दिनकर लक्ष्मण सौंदाणे यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरविण्यात आले.
नायगावचे माजी सरपंच पी.के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी बोडके (वडझिरे), दत्तात्रय तांबे (जोगलटेंभी), बाळासाहेब कापडी (देशवंडी), रघुनाथ लहाने (सोनगिरी), विक्रम दिघोळे (जायगाव) यांनी निवड समिती सदस्य म्हणून काम पाहिले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रमेश डोमाडे, संचालक दगू दिघोळे, मीननाथ कातकाडे, संतू पानसरे, कैलास गिते, बाबजी पाटील, रमेश लहाने, योगेश गायकवाड, मीना कातकाडे, विठाबाई लहाने, दिलीप पवार आदिंसह सभासद उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Agricultural award to farmers from Goda union