७७५ कोटी रुपये एलबीटी वसूल

By Admin | Updated: March 30, 2017 23:07 IST2017-03-30T23:07:41+5:302017-03-30T23:07:57+5:30

नाशिक : चालू आर्थिक वर्षात महापालिकेला एलबीटीच्या माध्यमातून शासन अनुदानासह आतापर्यंत ७७५ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे.

775 crores of LBT recovered | ७७५ कोटी रुपये एलबीटी वसूल

७७५ कोटी रुपये एलबीटी वसूल

 नाशिक : चालू आर्थिक वर्षात महापालिकेला एलबीटीच्या माध्यमातून शासन अनुदानासह आतापर्यंत ७७५ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यात शासनाकडून एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभारासह ३४२ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. दरम्यान, महापालिकेने यावर्षी निश्चित केलेल्या ८१० कोटी रुपयांच्या उद्दिष्टाकडे वाटचाल सुरू केली आहे.
५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवरील एलबीटी शासनाने रद्द केला आहे. त्या मोबदल्यात महापालिकेला दरमहा शासन अनुदान तसेच एक टक्का मुद्रांक अधिभाराची रक्कम पाठविली जाते. महापालिकेला केवळ ५० कोटी रुपयांच्या वरील उलाढालीवर एलबीटी वसूल करण्याचा अधिकार आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी महापालिकेने ८१० कोटी रुपये एलबीटी वसुलीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मागील वर्षी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात महापालिकेने ७५१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट समोर ठेवले होते, परंतु उद्दिष्टापेक्षाही महापालिकेने जास्त म्हणजे ८३३ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त केले होते. यंदा महापालिकेने आतापर्यंत सुमारे ७७५ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. त्यात महापालिकेला ५० कोटी रुपयांवरील उलाढालीतून मिळालेला एलबीटी ४३२ कोटी ९२ लाख रुपये इतका आहे. महापालिकेला शासनाकडून ठरविलेल्या उद्दिष्टानुसार दरमहा ३१.९१ कोटी रुपये अनुदान जमा होत असते. त्यानुसार महापालिकेला आतापर्यंत २९५ कोटी ६६ लाख रुपये एलबीटीपोटी मिळाले आहेत, तर एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभाराची ४६ कोटी ६१ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे.

Web Title: 775 crores of LBT recovered