जिल्ह्यात ५० कोटी रक्कम शिल्लक

By Admin | Updated: January 8, 2017 01:11 IST2017-01-08T01:11:34+5:302017-01-08T01:11:50+5:30

नोटबंदी : नवीन वर्षात बॅँका तंगीत

50 crore in balance in the district | जिल्ह्यात ५० कोटी रक्कम शिल्लक

जिल्ह्यात ५० कोटी रक्कम शिल्लक

नाशिक : नवीन वर्षात रिझर्व्ह बॅँकेकडून नवीन चलनाचा पुरवठाच न झाल्याने जिल्ह्याच्या बॅँका आर्थिक तंगीत सापडल्या असून, ग्रामीण भागात स्टेट बॅँकेकडे फक्त ५० कोटी रुपये शिल्लक असल्याने व त्यात नोकरदारांच्या पगाराची वेळ आल्याने बाका प्रसंग उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केंद्र सरकारच्या नोटबंदीला साठ दिवस पूर्ण होत असताना अद्यापही आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येऊ शकलेली नाही. सरकारने आठवड्याला २४ हजार रुपये बॅँकेतून काढता येतील, असे जाहीर केलेले असले तरी, बॅँका फक्त चार ते पाच हजार रुपयेच ग्राहकांच्या हातावर टेकवीत असून, बहुतांशी एटीएम पैसे शिल्लक नसल्याने बंदच आहेत. अशा आर्थिक परिस्थितीशी तोंड देत सरकारने सांगितलेले पन्नास दिवस नागरिकांनी कसेबसे काढले असले तरी त्यानंतरही परिस्थिती सुधारलेली नाही. रिझर्व्ह बॅँकेकडून जिल्ह्यासाठी मागणीच्या तुलनेत अल्प चलन पुरवठा केला जात असून, नवीन वर्षात तर मोठी रक्कम प्राप्तच झालेली नाही. सध्या स्टेट बॅँकेच्या ग्रामीण शाखांमध्ये ५० कोटी रुपये शिल्लक आहेत, तर शहरातील सर्व पैसे संपल्याने स्टेट बॅँक आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यातच महिन्याची सात तारीख पगाराची असल्यामुळे शुक्रवारी स्टेट बॅँकेत पैशांचा खडखडाट झाल्याने ग्रामीण भागातून दहा कोटी रुपये तातडीने आणून व्यवस्था करण्यात आली आहे.
शनिवारी रिझर्व्ह बॅँकेकडून स्टेट बॅँकेला ५० कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले, मात्र सायंकाळपर्यंत पैसे प्राप्त झालेले नाहीत, रविवारी तशाही बॅँका बंदच राहणार असून, सोमवारी पगारदारांची पैसे काढण्यासाठी गर्दी होणार असल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 50 crore in balance in the district