काँग्रेसला नवा जिल्हाध्यक्ष मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:21 IST2021-06-20T04:21:22+5:302021-06-20T04:21:22+5:30

नंदुरबार : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस शनिवारी देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा केला. खासदार ...

When will the Congress get a new district president? | काँग्रेसला नवा जिल्हाध्यक्ष मिळणार कधी?

काँग्रेसला नवा जिल्हाध्यक्ष मिळणार कधी?

नंदुरबार : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस शनिवारी देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा केला. खासदार राहुल गांधी यांना २०२४ मध्ये कुठल्याही परिस्थितीत पंतप्रधानपदी बसवायचे हा संकल्प काँग्रेस कार्यकर्त्यांचा आहे. तोच मंत्र घेऊन देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आजपासून चैतन्य भरण्याचे काम काँग्रेस नेते करणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातही संकल्प दिन आणि केंद्र शासनाच्या महागाईच्या धोरणाच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पण संकल्प दिन साजरा करताना नंदुरबारच्या काँग्रेसचा जिल्हाध्यक्षपदाची जागा रिक्त असल्याची उणीव मात्र कार्यकर्त्यांना निश्चित जाणवली. जर जिल्हाध्यक्ष नियुक्त झाला असता तर संकल्प दिन कार्यक्रमाचे नियोजन अधिक विस्ताराने आणि जिल्हाभर नियोजनपूर्व झाले असते, अशी खंतही काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

नंदुरबार जिल्ह्याचे तत्कालिन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनी पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हापासून म्हणजे जवळपास दोन वर्षापासून काँग्रेसला जिल्हाध्यक्ष नाही. रघुवंशींच्या पक्षाच्या राजीनाम्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून दिलीप नाईक व सुभाष बुला पाटील यांच्याकडे सूत्रे देण्यात आली. तेव्हापासून ते काम पाहत आहेत. तब्बल वर्षभरानंतर जिल्ह्यातील कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यातही नंदुरबार तालुका अध्यक्षांसह इतर पदे मात्र अजूनही रिक्तच आहेत. एकेकाळी नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या नंदुरबार जिल्ह्याला काँग्रेसचा अध्यक्ष दोन वर्षापासून मिळू नये हा राजकारणातील सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. तसे पाहता जिल्ह्यात गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता. या पक्षाला मिळालेली मतेदेखील पक्ष जिल्ह्यात भविष्यात भक्कमपणे पुन्हा पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो याचे संकेत देणारे होते. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने चार जागांपैकी पूर्वीप्रमाणे दोन जागा राखल्या. मतांची संख्या निश्चित कमी झाली पण दोन जागा कायम राहिल्या. पुढे पक्षाला कॅबिनेट मंत्रीपदही मिळाले. राज्याच्या मंत्रीमंडळात ॲड.के.सी. पाडवी यांना आदिवासी विकासमंत्रीपद हे महत्त्वाचे खाते मिळाले. जिल्ह्याचे पालकमंत्रीदेखील तेच आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही काँग्रेसचे २३ सदस्य विजयी झाले असून अध्यक्षपद याच पक्षाकडे आहे. त्यामुळे एकूणच जिल्ह्याच्या सत्तेच्या वाट्यात काँग्रेसला मोठे स्थान आहे. असे असताना पक्ष संघटनाबाबत मात्र पूर्वीसारखा उत्साह दिसून येत नाही.

जिल्ह्यात सध्या काँग्रेस पक्षात शिस्त आणि सुसूत्रतेचा अभाव निश्चितच जाणवत आहे. त्याचा कार्यकर्त्यांना चांगलेच फावत आहे. अशातच पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे पुढील आठवड्यात नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नाना पटोले हे पक्षाला आक्रमक प्रदेश अध्यक्ष लाभले असून त्यांनी पक्ष संघटनावर अधिक भर दिला आहे. त्यांच्या दौऱ्याची प्राथमिक तयारीही कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे किमान त्यांच्या दौऱ्याच्या पूर्वी किंवा दौऱ्याच्या कार्यक्रमात काँग्रेसचा जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा होईल का याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: When will the Congress get a new district president?