रेडझोनमधील वाहनधारकांना प्रतिबंध हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 12:07 IST2020-06-09T12:07:11+5:302020-06-09T12:07:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : रेडझोनमधील वाहने वाळू भरण्यासाठी बंदी असतानाही प्रकाशा येथील पेट्रोल पंप व प्रकाशा-तळोदा रस्त्यावर दुपारपासून ...

Vehicle owners in the red zone should be banned | रेडझोनमधील वाहनधारकांना प्रतिबंध हवा

रेडझोनमधील वाहनधारकांना प्रतिबंध हवा

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : रेडझोनमधील वाहने वाळू भरण्यासाठी बंदी असतानाही प्रकाशा येथील पेट्रोल पंप व प्रकाशा-तळोदा रस्त्यावर दुपारपासून तर रात्रीपर्यंत शेकडो वाहनांची रांग लागते. या वाहन चालकांच्या तोंडाला मास्क नाही, सोशल डिस्टनसिंग नाही, पान-गुटखा खाऊन तेथेच थुंकतात. या प्रकारामुळे प्रकाशा गावाला कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. या वाहनांवर पोलीस व महसूल विभागाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी राज्यातील व रेडझोन जिल्ह्यातील वाहनांना बंदी घातली आहे. मात्र आपल्याच राज्यातील रेडझोनमधील वाहने थेट प्रकाशा येथे गुजरातमधील वाळू भरण्यासाठी दाखल होत आहेत. दुपारी बारा ते रात्रीपर्यंत शेकडो वाळू वाहणारी ट्रक, डंपर ही वाहने एकामागून एक जमा होतात आणि रात्री गुजरात हद्दीमध्ये जाऊन वाळू भरून पहाटे सुसाट निघतात. महाराष्टÑाच्या हद्दीजवळील गुजरातमधील यावल, सावळदा, भमसाळ, देवळा आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळूचा साठा केला असून दुरुन हा साठा म्हणजे डोंगर आहे की काय असे दिसते. येथील वाळूला मोठी मागणी असल्याने कोरोनाच्या रेडझोनमधील पुणे, मुंबई, दादर, नाशिक, ठाणे, जळगाव, चोपडा, धुळे, शिरपूर येथून ही सर्व वाहने वाळू भरण्यासाठी प्रकाशा येथे दुपारपासूनच गर्दी करतात. प्रकाशा येथील पेट्रोल पंप, रस्त्यावर, प्रकाशा ते तळोदा रस्त्यावर आदी ठिकाणी ते थांबतात. या वाहनांच्या चालक व क्लीनर यांच्या तोंडाला मास्क नसतो, गुटखा-तंबाखू खाऊन तेथेच थुंकतात. रात्र झाली की गुजरातकडे जातात आणि तेथून वाहनात वाळू भरून रात्रीच्या रात्री प्रसार होतात.
जिल्ह्याबाहेरील वाहनांना प्रवेशबंदी असतानाही रेडझोनमधील वाहने प्रकाशा येथे का थांबतात? यामुळे प्रकाशा ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. या वाहनांमुळे कोरोनाचा प्रसार होऊन प्रकाशा ग्रामस्थांसाठी ते धोकेदायक ठरू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व बाबींची खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच दखल घेऊन रेडझोनमधील एकही वाहन प्रकाशा हद्दीत थांबल्यास त्याचावर पोलीस, महसूल विभागाने कारवाई करावी, अशी मागणी प्रकाशा ग्रामस्थांकडून होत आहे.

Web Title: Vehicle owners in the red zone should be banned