सलसाडी येथे ५० बेडच्या कोविड रुग्णालयास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:17 IST2021-03-29T04:17:58+5:302021-03-29T04:17:58+5:30

या पार्श्वभूमीवर तळोद्यात नवीन कोविडच्या सुसज्ज सेंटरला जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. हे सेंटर तालुक्यातील सलसाडी येथे उभारण्यात येत ...

Sanction for 50-bed Kovid Hospital at Salsadi | सलसाडी येथे ५० बेडच्या कोविड रुग्णालयास मंजुरी

सलसाडी येथे ५० बेडच्या कोविड रुग्णालयास मंजुरी

या पार्श्वभूमीवर तळोद्यात नवीन कोविडच्या सुसज्ज सेंटरला जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. हे सेंटर तालुक्यातील सलसाडी येथे उभारण्यात येत असून, ५० बेडला मान्यता देण्यात आली आहे. या कोविड सेंटरची उभारणी करण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या पूर्वीही तेथेच कोविड सेंटर उभारण्यात आले होते. त्यानंतर कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हे सेंटरदेखील बंद करण्याची सूचना प्रशासनाने दिली होती. त्यानुसार ते बंद करण्यात आले होते. आता पुन्हा कोविड सेंटर सुरू होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

वास्तविक नंदुरबार, शहाद्यानंतर तळोदा तालुक्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. येथे मेडिकल स्टाफ कमी असतानाही आहे ते कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत. शिवाय इतर रुग्णांवरदेखील उपचार करीत आहेत, असे असताना ऑक्सिजन बेड संख्या वाढविणे अपेक्षित आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत गंभीर विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ऑक्सिजन बेड सुविधा द्यावी

जिल्हा प्रशासनाने तळोदा तालुक्यातील सलसाडी येथे ५० बेडच्या कोविड सेंटरला मान्यता दिले असले तरी तेथे ऑक्सिजन सुविधा नाही. त्यामुळे गंभीर कोरोना रुग्णांस उपचाराकरिता त्याचा लाभ मिळणार नाही. सध्या कोरोनाच्या गंभीर रुग्णाची संख्या अधिक आहे. शिवाय येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचे केवळ पाच बेड आहेत. तेही फुल्ल राहत असल्यामुळे रुग्णांना नाइलाजास्तव नंदुरबार, शहादा, सुरत येथे जावे लागत आहे. तेथील अवाढव्य खर्च पाहता गरीब रुग्ण जाऊ शकत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुसज्ज मेडिकल टीमसह येथे अथवा उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी, अशी आदिवासी जनतेची मागणी आहे.

तळोदा तालुक्यातील सलसाडी येथे ५० बेडच्या कोविड सेंटरला प्रशासनाने मान्यता दिली आहे. हे सेंटर उभारण्यासाठी तयारी करण्यात येत असून, लवकरच सुरू होईल. - डॉ.महेंद्र चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी, तळोदा

Web Title: Sanction for 50-bed Kovid Hospital at Salsadi