मोलगी येथील महाविद्यालयात झालेली पदभरती अयोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST2021-02-05T08:08:44+5:302021-02-05T08:08:44+5:30

मोलगी : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरु करण्यात आले ...

The recruitment in the college at Molgi is inappropriate | मोलगी येथील महाविद्यालयात झालेली पदभरती अयोग्य

मोलगी येथील महाविद्यालयात झालेली पदभरती अयोग्य

मोलगी : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरु करण्यात आले आहे. या महाविद्यालयात नुकतीच पदभरती करण्यात आली असून, या पदभरतीत आदिवासी संवर्गातील एकाही उमेदवाराचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही भरती अयोग्य असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत नागरिकांनी सिनेट सदस्य दिलीप रामू पाटील यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात सातपुड्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोलगी या १०० टक्के आदिवासी भागात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने महाविद्यालय सुरु केले आहे. याचे तालुक्यातून स्वागत करण्यात आले. परंतु, मोलगी परिसर हा आदिवासी बहुल असतानाही या महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या पदभरतीत आदिवासी उमेदवारांचा समावेश करण्यात आलेला नाही. या पदभरतीतील सर्व जागा ह्या सर्वसाधारण संवर्गातून भरण्यात आल्या आहेत. एकही जागा पेसांतर्गत काढली गेली नाही. त्यामुळे परिसरात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विद्यापीठाने या महाविद्यालयाला राज्य शासनाची मान्यता आहे का, किती विद्यार्थी प्रवेशित आहेत, आरक्षण कसे मंजूर केले गेले, याची माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सर्व पदे सर्वसाधारण गटातून कशी भरणार, प्राचार्यांची नियुक्ती, महाविद्यालय सुरु असलेली जागा कोणाच्या मालकीची, ग्रामपंचायतीचा ठराव, ग्रामपंचायत सदस्यांची सहमती आहे किंवा कसे, यासह विविध प्रश्नांची उत्तरे मोलगी परिसरातील नागरिकांना देण्यात यावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे गजानन सिंगा वसावे यांनी केली आहे.

Web Title: The recruitment in the college at Molgi is inappropriate