बम्बई से आया मेरा दोस्त, ना बाबा... कोरोंटाईन करो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 01:44 PM2020-06-02T13:44:41+5:302020-06-02T13:44:49+5:30

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ८० च्या दशकातील ‘आप की खातीर’ या चित्रपटातील बप्पी लहरी यांनी ...

My friend came from Bombay, no Baba ... quarantine | बम्बई से आया मेरा दोस्त, ना बाबा... कोरोंटाईन करो

बम्बई से आया मेरा दोस्त, ना बाबा... कोरोंटाईन करो

Next

रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ८० च्या दशकातील ‘आप की खातीर’ या चित्रपटातील बप्पी लहरी यांनी गायलेले गाणे ‘बम्बई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो...’ हे गीत खूपच गाजले होते. सध्या हे गीत नव्याने नवीन स्वरुपात चर्चेत आले आहे. आता हेच गीत, ‘बम्बई से आया मेरा दोस्त, ना बाबा... दोस्त को कोरोंटाईन करो’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्याला कारणही तसेच आहे. नंदुरबार जिल्हा एकवेळा कोरोनामुक्त झाल्यानंतर आता मुंबई कनेक्शनने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मुंबईबाबत लोक धास्तावले आहेत.
खान्देशात तुलनेत कोरोनाबाबत नंदुरबार जिल्ह्याची स्थिती समाधानकारक असली तरी अधूनमधून सापडणारे पॉझिटीव्ह रुग्ण नागरिकांची धडकी वाढवणारे ठरत आहेत. विशेष म्हणजे नवीन जे रुग्ण सापडत आहेत त्यात सर्व मुंबईहून परत आलेल्यांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यात सुरुवातीपासूनच कोरोनाबाबत नागरिकांनी सावधानता बाळगली आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. मात्र दुसऱ्या आणि तिसºया टप्प्यात रुग्ण आढळून आले. पण त्यासंदर्भातही प्रशासनाने चांगल्या उपाययोजना केल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही बºयापैकी राहिले. विशेषत: एकवेळ अशी होती की, रुग्णालयात कोरोनाचे जेवढे रुग्ण उपचार घेत होते ते सर्व दुरुस्त होऊन त्यांना घरी सोडण्यात आल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. त्याची चर्चा सर्वदूर झाली. महाराष्टÑात सर्वप्रथम असे नंदुरबारला घडले होते. त्यामुळे राज्यभरातून जिल्हा प्रशासनाचे कौतुकही केले जात होते. विविध ठिकाणाहून प्रशासनाने कुठल्या उपाययोजना केल्या याची माहिती घेतली जात होती. पण हा आनंद २४ तासही राहिला नाही. तोच नवीन रुग्ण सापडले.
खास करून दुसºया टप्प्यात सापडलेल्या रुग्णांचे थेट मुंबई कनेक्शन होते. शासनाने स्थलांतरितांना परवानगी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे राज्यातूनच नव्हे तर देशभरातून आणि काही विदेशातूनही जिल्ह्यात गेल्या महिनाभरात लोक आले. ही संख्या ६० हजारापेक्षा अधिक आहे. त्यात जवळपास ४० हजार मजुरांचा समावेश आहे. ज्यावेळी सुरुवातीला मजुरांचा ओघ सुरू झाला त्यावेळी भीती व्यक्त केली जात होती. परंतु बाहेर राज्यात असलेले जिल्ह्यातील मजुरांच्या वसाहतीदेखील शहरापासून लांब असल्याने हे मजूर कोरोनापासून लांब राहिले. त्यामुळे गेल्या महिनाभरात कुठेही मजुरांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले नाही. स्थलांतरित मजूर सध्या रोजगार हमीच्या कामांवर व इतर कामांवर काम करीत आहेत.
परंतु नोकरवर्ग व व्यावसायिक जे बाहेरून आले आहेत त्यातील काहींची तपासणी होत आहे, काही तपासणी करीत नसल्याने ते धोकेदायक ठरत आहेत. जिल्ह्यात मध्यंतरी लंडनमधून एक विद्यार्थी आला होता. मात्र हा विद्यार्थी तात्काळ क्वारंटाईन सेंटरला क्वारंटाईन झाला होता. असे अनेक जण संस्थात्मक क्वारंटाईन झाले. पण काही जणांना मात्र घरीच क्वारंटाईनचा सल्ला दिला जातो. ते पाळत नसल्याने अनेकवेळा त्याचे इतरांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो.
रजाळे, ता.नंदुरबार येथील कुटुंब मुंबईहून आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली. सध्या ते सर्व जण उपचार घेऊन घरी परतले आहेत. त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू झाल्याने ते लवकर बरेही झाले. पण हिंगणी, ता.शहादा येथील व्यक्ती मात्र जिल्हा रुग्णालयात उशिरा दाखल झाला. वास्तविक ते १५ मे पासून जिल्ह्यात आले होते. जर त्याचवेळी तपासणी करून जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले असते तर त्यांचा मृत्यू टळू शकला असता. दुसरीकडे त्यांच्या अहवालाबाबतदेखील संभ्रमावस्था होती. पहिला अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर मृत्यूनंतर त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अंत्यसंस्कार करतानाही खबरदारी घेतली असली तरी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली नाही. परिणामी या मयताच्या संपर्कातील पुन्हा एक जण पॉझिटीव्ह आढळून आला आहे. नुकताच नंदुरबार शहरातही एक पॉझिटीव्ह रुग्ण आढळला असून त्यांचेही मुंबई कनेक्शन आहे.
एकूणच राज्यात मुंबई, औरंगाबाद, पुणे, मालेगाव हे कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याने तेथून परतलेल्या नागरिकांना तात्काळ संस्थात्मक क्वारंटाईन करण्याची आवश्यकता आहे. सध्या तरी जिल्ह्यात मुंबईबाबतची भीती आहे. त्यामुळे यापुढे मुंबई व इतर हॉटस्पॉटवरुन येणाºया नागरिकांवर प्रशासनाने बारकाईने नजर ठेवणे आवश्यक आहे. आजच्या स्थितीत अनेक व्यापारी व व्यावसायिक दर दिवसाआड मुंबईला ये-जा करीत आहेत. आतापर्यंत सर्व काही सुरक्षित असले तरी ही बाबदेखील कोरोनाचा संसर्ग वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. विशेषत: हॉटस्पॉट परिसरातून स्थलांतरित होणाºया नागरिकांना परवानगी देताना केवळ त्या भागातील प्रशासनाचीच परवानगीवर पास न देता संबंधित व्यक्ती ज्या भागात येत आहे त्या ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाची परवानगीही सक्तीची हवी, असा निर्णय राज्यातील काही जिल्ह्यांनी घेतला आहे. तसा निर्णय नंदुरबार प्रशासनानेही घेण्याची गरज आहे. कारण लवकरच पावसाळ्यास सुरुवात होत असून पावसाळ्यात या भागातील आरोग्याचे प्रश्न गंभीर होतात. कुपोषण आणि सिकलसेल अ‍ॅनिमिया ही सर्वात मोठी समस्या असून जर आदिवासी भागात कोरोनाचा फैलाव झाल्यास त्याचे मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होतील. त्यामुळे आतापासूनच त्याबाबतची काळजी घेणेही आवश्यक आहे.

Web Title: My friend came from Bombay, no Baba ... quarantine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.