म्हसावद पोलिसांचे सीमा भागाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:18 IST2021-03-29T04:18:26+5:302021-03-29T04:18:26+5:30

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहादा तालुक्यातील मंदाणे येथून अवघ्या पाच-सहा किलोमीटरवर मध्य प्रदेशातील राज्य सीमा आहे. तेथून पुढे ...

Mhaswad police neglect border area | म्हसावद पोलिसांचे सीमा भागाकडे दुर्लक्ष

म्हसावद पोलिसांचे सीमा भागाकडे दुर्लक्ष

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहादा तालुक्यातील मंदाणे येथून अवघ्या पाच-सहा किलोमीटरवर मध्य प्रदेशातील राज्य सीमा आहे. तेथून पुढे पानसेमल, सेंधवा, इंदूरकडे जाणारा हा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे मंदाणेमार्गे मध्य प्रदेशात जाणाऱ्यांची संख्या व तिकडून महाराष्ट्रात येणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे वाहनांची वर्दळ मोठी असते. नंदुरबार जिल्ह्यात विशेषतः शहादा तालुक्यात पूर्व भागात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील पानसेमल तालुका प्रशासनाने गंभीर दखल घेत सीमेजवळ पोलीस, आरोग्य, महसूल व शिक्षक, कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. मध्य प्रदेशात जाणाऱ्या नागरिकांची आरोग्यदृष्ट्या विचारपूस करून चौकशी करून प्रवेश दिला जात आहे. हा सीमावर्ती भाग म्हसावद पोलीस स्टेशन अंतर्गत येतो. मात्र याठिकाणी पोलीस चेकपोस्ट नसल्याने मध्य प्रदेशातील वाहने महाराष्ट्रात, जिल्ह्यात सर्रासपणे प्रवेश करीत आहेत. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

वास्तविक मध्य प्रदेश राज्याला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असताना या मार्गाने बनावट दारू, गुटखा, गावठी कट्टा, गांजा, अफू यांची रात्री-बेरात्री अवैधरित्या वाहतूक बिनधास्तपणे सुरू असते. मात्र पोलिसांचे या भागात पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने अवैध धंदेवाल्यांना रान मोकळे असते. तशातच शहादा तालुक्यात कोरोना या महामारीने कहर केलेला असताना जिल्हा प्रशासनाने जिल्हा सीमा व राज्य सीमा याठिकाणी तपासणी नाके कार्यान्वित केलेले आहेत. परंतु म्हसावद पोलीस या सीमा भागाकडील रस्त्याकडे कधीच फिरकत नाहीत. त्यामुळे मध्य प्रदेशाकडून नागरिक महाराष्ट्रात बिनधास्तपणे प्रवेश करतात. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून म्हसावद पोलिसांना आदेशित करून भामराटानाका याठिकाणी ताबडतोब चेकपोस्ट कायमस्वरूपी कार्यान्वित करावे. त्यामुळे कोरोना महामारी संक्रमणासह अवैध धंद्यांवर आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Mhaswad police neglect border area