कोरोनामुळे माहेरची वाट आणि माहेरची साडी सध्या दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:29 IST2021-05-16T04:29:48+5:302021-05-16T04:29:48+5:30

लॉकडाऊन परिस्थितीत सध्या २५ लोकांचीच अनुमती लग्नकार्यासाठी शासनाने दिली आहे. अशा परिस्थितीतही अनेक ठिकाणी लग्न सोहळे पार पडत आहेत. ...

Maher's wait and Maher's sari are far away because of the corona | कोरोनामुळे माहेरची वाट आणि माहेरची साडी सध्या दूरच

कोरोनामुळे माहेरची वाट आणि माहेरची साडी सध्या दूरच

लॉकडाऊन परिस्थितीत सध्या २५ लोकांचीच अनुमती लग्नकार्यासाठी शासनाने दिली आहे. अशा परिस्थितीतही अनेक ठिकाणी लग्न सोहळे पार पडत आहेत. लग्न झाल्यावर मुलींना माहेरी न जाता सासरीच रममाण होण्याची वेळ सध्या निर्माण झाली आहे. शासनाने कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावले असून, महामंडळाच्या बसेस तसेच खासगी वाहनांवरही बंदी आणल्याने लग्नानंतर महिन्याभरात दोन-तीनदा माहेरी जाणारी नवविवाहित सध्या सासरीच माहेरच्या आठवणींना उजाळा देत आहे.

ज्या विवाहितांच्या लग्नाला दहा- बारा वर्षे झाली आहेत, तेही वर्षभरापासून माहेरी जाण्यासाठी कासावीस होत आहेत. सध्या त्यांच्या मुलांच्या शाळांना सुट्टी असल्यामुळे माहेरी चार दिवस जन्मदात्या आई- वडिलांबरोबर राहून त्यांची सेवा करण्याची प्रत्येक मुलीची मनोमन इच्छा असते. मात्र, कोरोनाने माहेरची वाट दूर केली आहे. त्यामुळे नवविवाहित मुली आपल्या माहेरातील आई, वडील, भाऊ, बहीण व इतर मंडळींशी मोबाईलद्वारे आभासी भेट घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. कधी - कधी व्हिडिओ कॉल करून माहेरच्या मंडळीशी गप्पा मारून जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीला आपल्या माहेरची आठवण येणे स्वाभाविक आहे; पण सध्या लॉकडाऊनमुळे माहेरच्या पाहुणचाराला सुद्धा त्यांना मुकावे लागत आहे. लग्न कार्याला पंचवीस लोकांचीच परवानगी असल्याने आप्तस्वकीयांच्या लग्नालाही त्यांना उपस्थिती दर्शविता येत नाही.

गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे माहेरच्या साडीपासूनही त्यांना वंचित राहावे लागत आहे. नवविवाहितेसाठी सासरचे घर नवीनच असते. त्यांना एकाकी वाटू नये म्हणून महिनाभरात दोन-तीन वेळा माहेरी आणले जाते किंवा आई-वडील भेटण्यासाठी जातात. मात्र, संचारबंदीमुळे नवविवाहितांचे माहेरी जाणे तूर्तास तरी बंद आहे. तसेच माहेरी एखाद्याचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठीही शासनाने मोजक्या लोकांची अट घातल्याने त्यांना तेथेही हजेरी लावता येत नाही. म्हणून प्रत्येक ग्रामीण तसेच शहरी भागातील नवविवाहितांना केव्हा लॉकडाऊन खुले होईल आणि केव्हा माहेरी जायला भेटेल याचे वेध लागले आहेत.

Web Title: Maher's wait and Maher's sari are far away because of the corona