खेडदिगर वनउपज तपासणी नाके निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:49 IST2020-03-18T12:49:28+5:302020-03-18T12:49:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या खेडदिगर येथे अवैध वृक्षतोड व वाहतूक रोखण्यासाठी वनउपज ...

The Kheedigar Forest Products inspection is useless | खेडदिगर वनउपज तपासणी नाके निरुपयोगी

खेडदिगर वनउपज तपासणी नाके निरुपयोगी

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या खेडदिगर येथे अवैध वृक्षतोड व वाहतूक रोखण्यासाठी वनउपज तपासणी नाका आहे. परंतु याठिकाणी कुणीही अधिकारी वा कर्मचारी फिरकत नसल्याने हा नाका रामभरोसे बनला आहे.
मध्य प्रदेशच्या सीमेवर लाकूड तस्करी रोखण्यासाठी खेडदिगर येथे वनविभागाचा वनउपज तपासणी नाका आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेला हा नाका महत्वपूर्ण मानला जातो. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा नाका कार्यान्वित असला तरी याठिकाणी एकही अधिकारी वा कर्मचारी फिरकत नसल्याने वनउपज नाका रामभरोसे बनला आहे. या वनउपज तपासणी नाक्याजवळून मोठया प्रमाणावर अवैध लाकडाची तस्करी केली जाते. परंतु आजपर्यंत लाकूड तस्करीची एकही कारवाई झाली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याठिकाणी कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून होणारी लाकूड तस्करीवर आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.
संरक्षण कुंपणची दुर्दशा
या वनउपज नाक्याचे कार्यालय व कर्मचारी निवासस्थानांना संरक्षण कुंपन बनविले आहे. मात्र कुपंणाची दुर्दशा झाल्याने येथे मोकाट गुरांचा नेहमी वावर असतो तर काहींनी रात्रीच्या बैठका व इतर गोष्टीसाठी याचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे याठिकाणी अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
निवासस्थान धूळखात
खेडदिगर येथील वनउपज तपासणी नाक्यावर नेमणुकीला कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान, शौचालय बांधण्यात आले आहे. परंतु याठिकाणी अधिकारी किंवा कर्मचारीच फिरकत नसल्याने हे निवासस्थान धूळखात पडले आहे. तसेच कार्यालय व निवासस्थान परिसरात घाणीचे साम्राज्यही निर्माण झाले आहे.

Web Title: The Kheedigar Forest Products inspection is useless