आदिवासी नृत्यात रमले राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 01:06 PM2020-02-21T13:06:16+5:302020-02-21T13:06:23+5:30

अनिल जावरे/कैलास खोंडे । लोकमत न्यूज नेटवर्क मोलगी : भगदरी शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ...

The governor engaged in tribal dance | आदिवासी नृत्यात रमले राज्यपाल

आदिवासी नृत्यात रमले राज्यपाल

Next

अनिल जावरे/कैलास खोंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोलगी : भगदरी शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्यात सहभागी होत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ढोलच्या तालावर ठेका धरला.
पालकमंत्री अ‍ॅड. के. सी. पाडवी, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड. सीमा वळवी, राजभवनाचे प्रधान सचिव संतोषकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आणि माजी आमदार नरेंद्र पाडवी हे देखील नृत्यात सहभागी झाले. या कार्यक्रमात होळी नृत्य, लग्नातील पारंपरिक आदिवासी नृत्य, ढोल नृत्य, पारंपरिक आदिवासी नृत्याद्वारे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले. कार्यक्रमात सामाजिक संदेशही देण्यात आले.
राज्यपालांनी विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले. आपल्या संस्कृतीचे संवर्धन केल्यास देश महान होईल. दुर्गम भागातील घरे लहान असू देत, माणसे गरीब असू देत, यांचे हृदय शुद्ध आणि पवित्र आहे. आदिवासी मुलांमध्ये गुणवत्ता आणि क्षमता आहे. त्यामुळे राज्यात आदिवासी बांधवांसाठी चार क्रीडा प्रबोधिनी उभारण्यात येणार असल्याचे राज्यपाल कोश्यारी म्हणाले. त्यापैकी एक नंदूरबार येथे उभारण्यात येईल. विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे आणि मातृभाषेवर प्रभुत्व संपादन करावे. तरच जीवनात यशस्वी होता येईल. आपली भाषा, प्रदेश आणि संस्काराचा अभिमान बाळगावा. जीवनात चांगल्या संस्कारांच्या आधारे यश संपादन करावे, अशा शुभेच्छा त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या. कोश्यारी यांनी चांगले कार्यक्रम सादर केल्याबद्दल विद्यार्थ्यांना २५ हजारांचे पारितोषिक जाहीर केले. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना खाऊसाठी ११ हजार रुपये देणार असल्याचे ते म्हणाले. शाळेच्या आवश्यक गरजांसाठी प्रस्ताव आल्यास सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी राज्यपाल आदिवासी संस्कृतीशी समरस झाले, त्यांनी संस्कृती जपण्याचा सल्ला दिला ही महत्त्वाची बाब आहे. या गावात अनेक विकास कामे चांगल्या प्रकारे झाली आहेत. अशी कामे इतरत्र होणे गरजेचे आहे. त्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी राज्यपालांचे मार्गदर्शन आणि सहकार्य महत्वाचे ठरेल, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील मुलांना चांगले शिक्षण देऊन प्रशासकीय सेवेत आदिवासी युवकांनी यावे यासाठी प्रयत्न करण्यात येत असून शाळांमधून गुणवत्ता शोध सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले.
यावेळी खासदार गावित, जि. प. अध्यक्ष वळवी यांनी आपले विचार व्यक्त केले. तत्पुर्वी कोश्यारी यांच्या हस्ते पशुसंवर्धन केंद्राचे उदघाटन करण्यात आले. त्यांनी पेरू बाग, आंबा बाग आणि पॉली हाऊसच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. आदिवासी बांधवांसोबत खाटेवर बसून त्यांनी बागेतील फळांचा आस्वाद घेतला. गावात वेगळ्या प्रकारचे समाधान मिळते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा यांनी केले, तर जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी आभार मानले.


भगदरी येथे कृषी विभागा मार्फत बांधण्यात आलेल्या जलयुक्त शिवाराअंतर्गत मातीबांध नाल्याची पाहणी त्यांनी केली. नाल्यात पाणी नसल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली. या परिसरात १६ बंधारे असुन या नालेबांधचा लोकांना कितपत उपयोग होतो याबाबत ग्रामस्थांशी चर्चा करुन खंत व्यक्त केली. १६ मातीबांध बांधण्यात आले असून १६ बंधाऱ्यात पाणी साठा नसल्याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले. याठिकाणी पाणी साठवुन जास्तीत जास्त पाणी सिंचनासाठी उपयोगी आणावे अशा सुचना राज्यपालांनी दिल्या.


मोलगीसह दुर्गम भागात गेल्या अनेक दिवसांपासून बीएसएलची मोबाईल रेंज नव्हती. परंतु राज्यपालांचा दौऱ्यामुळे गुरुवारी दिवसभर मोबाईल रेंज होती. या भागातील नागरिकांनीही त्याबाबत आश्चर्य व्यक्त केले. कर्मचारी नसल्याने येथील दूरध्वनी केंद्र बंदच असते.


कंजाला येथील एकलव्य ग्रामीण आदिवासी विकास मंडळाने आयोजित केलेल्या आदिवासी संस्कृतीचे दर्शन, वनभाज्या व पारंपारिक कडधान्य साठवण याची पहाणी राज्यपालांनी केली. पळसाच्या फुलापासून तयार केलेल्या शरबतचा आस्वाद घेत प्रदर्शनाची पाहणी केली. भगदरीसह परिसरातील नागरिकांशी संवाद साधला.
४सरपंच प्रमिला दिनकर वसावे यांनी आदिवासी पारंपरिक मोेरपिसांचा मुकुट डोक्यावर घालत पर्यावरणयुक्त पुष्ष गुच्छ देऊन स्वागत केले.


पत्रकारांशी संवाद साधतांना राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले, राज्यातील मागास भागातील गावांना भेट देऊन जनतेच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी सरकारी यंत्रणेमार्फत योग्य त्या उपाययोजना राबवित आहे. अशा मागासलेल्या भागात एक दिवस मुक्काम करून तेथील लोकांशी हितगुज करणार आहे. त्यांची संस्कृती, लोकजिवन जवळून पहाता येणार आहे. एक रात्र का होईना त्यांच्या जिवनाशी एकरुप हेण्याचा माझा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: The governor engaged in tribal dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.