मयतांच्या कुटूंबियांना पाच लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 12:52 PM2021-01-24T12:52:22+5:302021-01-24T12:52:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धडगाव तालुक्यातील खडकी पॉईंट येथे झालेल्या वाहन अपघातात मृत व्यक्तींना सर्वतोपरी मदत करण्यात येईल ...

Five lakh assistance to the families of the deceased | मयतांच्या कुटूंबियांना पाच लाखाची मदत

मयतांच्या कुटूंबियांना पाच लाखाची मदत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील खडकी पॉईंट येथे झालेल्या वाहन अपघातात मृत व्यक्तींना सर्वतोपरी मदत करण्यात येईल आणि जखमी व्यक्तींवर आवश्यक उपचार करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांनी केले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मयतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखाची मदत जाहीर केली.
जिल्हा शासकीय रुग्णालय येथे खडकी येथील अपघातातील जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतल्यानंतर ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जि.प. समाज कल्याण सभापती रतन पाडवी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.के.डी. सातपुते उपस्थित होते. ॲड.पाडवी म्हणाले, झालेली दुर्घटना अत्यंत दुर्र्दैवी आहे. जखमींवर उपचार करून त्यांचे प्राण वाचविण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. 
मृत प्रवासी गरीब कुटुंबातील होते आणि त्यात पाच महिलांचा समावेश असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना आर्थिक सहाय्य देण्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. अशा दुर्घटना भविष्यात होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांनी जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि त्यांनी धीर दिला. जखमी व्यक्तींच्या उपचारात कोणतीही कमतरता ठेवू नये, अशा सूचना त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. महिंद्रा मॅक्स वाहनातून २४ मजूर खडकी येथून गुजरातमधील रोस्का येथे जात असताना खडकीजवळील घाटात वाहकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलट       दिशेने ५०० मीटर खोल दरीत कोसळले. घटनेची माहिती      मिळताच जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अधिकाऱ्यांना मदतीचे निर्देश दिले. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्वत: घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्याची पाहणी केली. उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे हेदेखील यंत्रणेसह घटनास्थळी पोहोचले.
अपघातात सहा व्यक्तींचा मृत्यू झाला. सात गंभीर प्रवाशांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. उर्वरित ११ प्रवाशांना किरकोळ दुखापत असल्याने त्यांना तोरणमाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. दुपारी त्यातील आठ व्यक्तींना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदत...
नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळजवळ खडकी येथे मजुरांच्या वाहनाला अपघात होऊन सहा व्यक्ती मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यात पाच महिलांचा समावेश आहे. या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. मरण पावलेले मजूर हे आदिवासी असून अतिशय दुर्गम अशा धडगाव तालुक्यातील  आहेत. याशिवाय या अपघातात गंभीर व किरकोळ जखमी झालेल्या सर्वांवर उपचार सुरू असून ते देखील शासनाच्या खर्चानेच करण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. आज या घटनेची माहिती कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री के.सी. पाडवी तसेच जिल्हा प्रशासनाकडून याची माहिती घेत संपूर्ण मदत करण्याचा सूचना दिल्या.

Web Title: Five lakh assistance to the families of the deceased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.