६७ हजार घरांना वीजजोडणी देणार-खा. हिना गावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:28 IST2021-03-15T04:28:33+5:302021-03-15T04:28:33+5:30

नंदुरबार : केंद्र शासनाच्या हर घर बिजली योजनेअंर्गत जी घरे सुटली असतील अशा ६७ हजार घरांना वीजजोडणी दिली जाईल. ...

Electricity will be provided to 67 thousand houses. Hina Gavit | ६७ हजार घरांना वीजजोडणी देणार-खा. हिना गावीत

६७ हजार घरांना वीजजोडणी देणार-खा. हिना गावीत

नंदुरबार : केंद्र शासनाच्या हर घर बिजली योजनेअंर्गत जी घरे सुटली असतील अशा ६७ हजार घरांना वीजजोडणी दिली जाईल. शिवाय खासगी रुग्णालयांना दिली जाणारी वाणिज्य वीज बिलांऐवजी घरगुती वापराची वीजबिले द्यावी, याबाबत संबंधितांना सूचना दिल्याची माहिती खा. डॉ. हिना गावीत यांनी दिली.

खा. गावीत यांनी सांगितले की, प्रधानमंत्री हर घर बिजली योजनेअंतर्गत जिल्ह्यात तब्बल दीड लाख घरांना वीजजोडणी देण्यात आली आहे. काही गावांत काही घरे सुटल्याच्या तक्रारी आहेत. त्यासंदर्भात ग्रामविकास विभाग आणि वीज कंपनी यांना अशा घरांचा सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ग्रामविकास विभागाच्या सर्व्हेत ६७ हजार तर वीज कंपनीच्या सर्व्हेत १७ हजार घरे निघाली. आणखी एकदा पडताळणी करून ज्या घरांना जोडणी दिली गेली नाही, त्या सर्व घरांना जोडणी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी निधीची कमतरता राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खासगी डॅाक्टरांचे घर व दवाखाना अशा एकत्रित असलेल्या इमारतीला वाणिज्य वापराचे वीजबिल दिले जाते. वास्तविक नियमानुसार, अशा ठिकाणी घरगुती वापराचा नियम लावून वीजबिल दिले गेले पाहिजे. यासाठी आपण दिशा समितीच्या बैठकीत सूचना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाला शौचालय देण्यासाठी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत कामे करण्यात आली आहेत. बेस लाईन सर्व्हेमध्ये दोन लाख ५६ हजार घरांची यादी करण्यात आली होती. त्यापैकी २ लाख ३४ हजार घरांना शौचालये बांधून देण्यात आली. दुसऱ्या सर्व्हेमध्ये २८ हजार ४४४ घरांची नोंदणी करण्यात आली. त्यातील २६ हजार ७९७ घरांना शौचालये दिली. तिसऱ्या सर्व्हेत १३ हजार १८१ घरांची यादी केली त्यातील १२ हजार ९०६ घरांना शौचालये बांधून देण्यात आली आहेत. आता सहा हजार शौचालयांचे टार्गेट असून १,३५० घरांची यादी आली आहे. प्रत्येक घराला शौचालय देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मागणी केल्यास तात्काळ ते बांधून दिले जातील.

याशिवाय सॅालीड वेस्ट मॅनेजमेंट व ग्रे वेस्ट वॅाटर मॅनेजमेंट याअंतर्गत जिल्ह्यातील ३६ गावांची निवड करण्यात आली असून पुढील पाच वर्षांत प्रत्येक गावात या दोन योजना राबविल्या जाणार असल्याचेही खा.डॉ.हिना गावीत यांनी स्पष्ट केले. यावेळी आ. डॉ.विजयकुमार गावीत उपस्थित होते.

Web Title: Electricity will be provided to 67 thousand houses. Hina Gavit