३८ ग्रामपंचायतींची निवडणूक आणि ४९ ठिकाणी प्रभाग रचनेला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:36 IST2020-03-18T12:35:44+5:302020-03-18T12:36:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यात सुरु असलेल्या ३८ ग्रामपंचायतींचा निवडणूक ...

 Election of 4 Gram Panchayats and postponement of division in 19 places | ३८ ग्रामपंचायतींची निवडणूक आणि ४९ ठिकाणी प्रभाग रचनेला स्थगिती

३८ ग्रामपंचायतींची निवडणूक आणि ४९ ठिकाणी प्रभाग रचनेला स्थगिती

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यात सुरु असलेल्या ३८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम, ४९ ठिकाणी प्रभाग रचना, मतदार यादी कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे़ याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी दुपारी पारित केले़
धडगाव तालुक्यात १६, नवापुर १४, शहादा ५ तर तळोदा तालुक्यातील ३ अशा एकूण ३८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरु आहे़ यासाठी सोमवारी मुदतीअंती एकूण ९४३ अर्जांची छाननी करण्यात आली़ मंगळवारी वैध अवैध अर्जांची माहिती देऊन माघारीची मुदत सुरु करण्यात आली होती़ परंतू तत्पूर्वीच आयोगाने कार्यक्रम स्थगित केल्याने तालुकास्तरावर तातडीने हा कार्यक्रम थांबवण्यात आला़ दरम्यान यासोबत नंदुरबार तालुक्यातील २२, शहादा २२, तळोदा ४ तर अक्कलकुवा तालुक्यात १ अशा ४९ ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबरमध्ये संपणार आहे़ या गावांमध्ये प्रभाग रचना कार्यक्रम सुरु होता़ २१ मार्च रोजी प्रभागनिहाय मतदार याद्यांची घोषणा होणार होती़
निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्याची माहिती तालुका मुख्यालयातून मिळाल्यानंतर इच्छुक निराश झाल्याचे दिसून आले़ गेल्या १५ दिवसात या कार्यक्रमाला एकवेळा मुदतवाढ तसेच जात पडताळणीची अट शिथिल करण्यात आली होती़ पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत ही निवडणूक स्थगित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी दिली आहे़

Web Title:  Election of 4 Gram Panchayats and postponement of division in 19 places