कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या वडीलांनाच उपचारासाठी फिरफिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 12:44 PM2020-04-03T12:44:49+5:302020-04-03T12:44:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : कोरोना या विषाणूच्या लढाईत डोंबिवली येथे कोरोनाग्रस्तांसाठी २४ तास आहोरात्र सेवा देणाºया अक्कलकुवा तालुक्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : कोरोना या विषाणूच्या लढाईत डोंबिवली येथे कोरोनाग्रस्तांसाठी २४ तास आहोरात्र सेवा देणाºया अक्कलकुवा तालुक्यातील नाला येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज करणसिंग पाडवी यांच्या आजारी वडिलांना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात कोणताही उपचार न करता फिरवाफिरव करावी लागल्याची मन खिन्न करून टाकणारी घटना घडल्याने डॉक्टरांना नेहमी देव संबोधणारा समाज आजच्या परिस्थितीत हवालदिल झाला असून आश्चर्य व्यक्त होत आहे.
याबाबत आढावा घेतला असता मन गहिवरून टाकणारी घटना पुढे आली ती अशी : अक्कलकुवा तालुक्यातील नाला येथील डॉ.पंकज पाडवी सध्या डोंबिवली येथील एआयएमएस हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या रूग्णालयात रुग्णांना २४ तास सेवा देत आहेत. त्यांचे वडील व पं.स.चे माजी सदस्य करणसिंग पाडवी यांना १५ दिवसापासून ताप येत होता. त्यांच्या रक्ताची तपासणी केली असता टायफाईड असल्याचे निदान झाले. संपूर्ण देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यामुळे त्यांना परवा अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. या रुग्णालयात त्यांना हातही न लावता खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. खाजगी रुग्णालयांमधील डॉक्टरांनीही त्यांच्यावर उपचार करण्यास स्वारस्य न दाखवता इतरत्र दवाखान्यात जाण्याचे सूचवले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तात्काळ उपचार करणे आवश्यक असताना माझे वडील व त्यांच्यासोबत असलेली एक गरोदर महिला रुग्ण यांच्यावर कोणत्याही शासकीय अथवा खासगी रुग्णालयात उपचार झाले नसल्याचा संदेश मला मिळाल्याने वैद्यकीय क्षेत्रात असल्याने खूप अस्वस्थ झालो. त्याचवेळी मी या संपूर्ण घटनेची माहिती लिहून जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनासमोर घडलेला हा गंभीर प्रकार यावा म्हणून केवळ सामाजिक प्रसार माध्यम हे एकच प्रभावी माध्यम सद्यस्थितीत तरी असल्याने घडलेला प्रकार मी व्हायरल केला. हा प्रकार व्हायरल झाल्याने शहरातील आमलीबारी फाटा येथील डॉ.ईदसिंग वळवी यांनी पुढाकार घेत रुग्णाला अॅडमिट करून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. हा घडलेला प्रकार व्हायरल झाल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, प्रभारी तहसीलदार विजय कचवे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्निल मालखेडे यांनी त्वरित दखल घेत घडलेल्या प्रकाराची गंभीरतेने दखल घेऊन रुग्णावर उपचार करण्याच्या सूचना दिल्या.