सर्वाधिक वजनाचा दगड उचलून अजमावले शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:29 IST2021-05-15T04:29:00+5:302021-05-15T04:29:00+5:30

नंदुरबार : आ देखे जरा किसमे कितना है दम... या गाण्याची प्रचिती देत नंदुरबारातील माळीवाडा भागात अक्षय तृतीयेनिमित्त ...

Demonstrated strength by lifting the heaviest stone | सर्वाधिक वजनाचा दगड उचलून अजमावले शक्तिप्रदर्शन

सर्वाधिक वजनाचा दगड उचलून अजमावले शक्तिप्रदर्शन

नंदुरबार : आ देखे जरा किसमे कितना है दम... या गाण्याची प्रचिती देत नंदुरबारातील माळीवाडा भागात अक्षय तृतीयेनिमित्त सर्वाधिक वजनाचा दगड उचलून सालदारकीची परीक्षा युवकांनी दिली. अर्थात सालदारकीची प्रथा बंद झाली असली तरी माळीवाड्याने दगड उचलण्याची परंपरा कायम ठेवत युवकांची शक्ती अजमावली.

संचारबंदी व कोरोनाच्या नियमांचे पालन करीत जास्त गर्दी न होऊ देता ते पार पडले. खान्देशात पूर्वी अक्षय तृतीयेला सालदारांची नेमणूक केली जात होती. पूर्वी शेतीत यांत्रिकीकरण नव्हते, त्यामुळे केवळ पाळीव पशुंच्या साहाय्याने व मनुष्यबळावरच शेतीची कामे अवलंबून राहत होती. त्यामुळे सालदारांना मोठी मागणी होती. वर्षाचे ठराविक पैसे ठरवून, धान्य व कपडे देऊन त्याची राहण्याची व्यवस्था शेतकऱ्याकडे करावी लागत होती.

सालदार ठरविताना अनेक प्रथा व परंपरा होत्या. त्यातीलच एक नंदुरबारातील माळीवाड्यातील ‘दगड उचलण्याची’ प्रथा होय. माळीवाड्यातील सार्वजनिक चौकात अक्षय तृतीयेला पूर्वी पहाटेपासूनच ही स्पर्धा सुरू होत होती. त्यासाठी पंचक्रोशीतील अनेकजण उपस्थित राहत होते. एक क्विंटलपासून पाच क्विंटलपर्यंत वजनाचा दगड एका दमात उचलून तो खांद्यावर ठेवण्याची ही स्पर्धा रंगत होती. जी व्यक्ती एका दमात व इतरांपेक्षा अधिक वजनाचा दगड उचलत होती त्याला सालदार म्हणून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांमध्येही स्पर्धा लागत होती. अशावेळी जास्तीत जास्त पैसा जो देईल त्या शेतकऱ्याला असे सालदार पसंती देत होते.

आता ही परंपरा कालबाह्य ठरली असली तरी त्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी दरवर्षी अक्षय तृतीयेला हौशी युवक एकत्र येत दगड उचलून शक्ती अजमावण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी काहीजण अशा युवकांना रोख रकमेची बक्षिसे देखील देतात. गुरुवारी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेसाठी गर्दी झाली होती. जास्तीत जास्त दीड क्विंटलपर्यंत दगड उचलण्यात यावेळी यश आले. यावेळी माणिक माळी व परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Demonstrated strength by lifting the heaviest stone