शहादा तालुक्यात स्वॅब तपासणी केंद्र वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST2021-03-31T04:30:49+5:302021-03-31T04:30:49+5:30

कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढू लागल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे. थंडी, ताप, खोकला ...

Demand for expansion of swab examination center in Shahada taluka | शहादा तालुक्यात स्वॅब तपासणी केंद्र वाढविण्याची मागणी

शहादा तालुक्यात स्वॅब तपासणी केंद्र वाढविण्याची मागणी

कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढू लागल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे. थंडी, ताप, खोकला असणाऱ्या रूग्णांना खासगी डाॅक्टर सरळ कोरोना स्वॅब तपासणीचा सल्ला देत असल्याने नागरिकांची स्वॅब तपासणी करुन घेण्यासाठी मोहिदा क्वाॅरंटाईन सेंटरला गर्दी वाढत आहे. रोज सुमारे ३०० लोकांचे स्वॅब तपासणी होत असून, नागरिकांना स्वॅब देण्यासाठी भर उन्हात तासन् तास ताटकळत थांबावे लागते. मुळात मोहिदा सेंटर शहादा शहरापासून चार किमी लांब असल्याने स्वतःचे वाहन नसलेल्या नागरिकांना रिक्षाने किंवा पायपीट करत मोहिदा सेंटर गाठावे लागते. कोविड सेंटरचे नांव सांगताच रिक्षाचालकही नकार देत असल्याने नागरिकांची पंचाईत होते.

संपूर्ण तालुक्यात स्वॅब संकलनाचे मोहिदा हे एकमेव सेंटर असल्याने तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक स्वॅब देण्यासाठी येथे येतात. त्यामुळे प्रत्यक्ष नाव नोंदवूनही दोन-तीन तास स्वॅब देण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आरोग्य विभागाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वॅब संकलन केंद्र सुरू करण्याची नागरिकांची मागणी आहे. १ एप्रिलपासून जिल्ह्यात पुन्हा लाॅकडाऊन सुरू होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोहिदा सेंटरला जाण्यासाठी अधिक अडचणींचा सामना करावा लागेल. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन - दोन वैद्यकीय अधिकारी असल्याने एका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे स्वॅब तपासणीचे काम दिल्यास गावातील व परिसरातील ग्रामस्थांची सोय होऊ शकेल.

Web Title: Demand for expansion of swab examination center in Shahada taluka