नगरसेवक पूत्राच्या लग्नाच्या जेवनावळीला चढला राजकीय रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:06 IST2020-06-11T12:06:07+5:302020-06-11T12:06:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवकाच्या मुलाच्या लग्नाची मेजवानी सध्या नंदुरबारात फारच गाजत आहे. या ...

The corporator's son's wedding dinner took on a political color | नगरसेवक पूत्राच्या लग्नाच्या जेवनावळीला चढला राजकीय रंग

नगरसेवक पूत्राच्या लग्नाच्या जेवनावळीला चढला राजकीय रंग

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवकाच्या मुलाच्या लग्नाची मेजवानी सध्या नंदुरबारात फारच गाजत आहे. या मेजवानीत जेवना तयार करणाऱ्या खानसामालाच कोरोना झाल्याचे पुढे आले आहे. मेजवानीत उपस्थित राजकीय पदाधिकारी, अधिकारी यांचे यामुळे धाबे दणाणले आहे. प्रशासनाने चौकशी समिती नेमली आहे. तर आयोजकांनी खानसामा सुरत येथून मागविलेला होता. पॉझिटिव्ह व्यक्ती जेवनावळीत आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नंदुरबारातील नगरसेवकाच्या मुलाच्या जेवनावळीचा मुद्दा जिल्ह्यात चांगलाच गाजत आहे. या नगरसेवकाचे नातेवाईक असलेले खानसामा हे शहरात प्रसिद्ध आहेत. अनेक नेते, राजकीय पदाधिकारी यांच्या जेवनावळीसाठ त्यांनाच पाचारण केले जाते. या जेवनावळीसाठी देखील तेच खानसामा होते असे बोलले जात आहे. नेमके तेच खानसामा मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेला आता राजकीय रंग दिला जात असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांनी थेट माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे.
मंगळवारी संबधीत खानसामा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने या जेवनावळीची जोड देत अनेकांनी सोशल मिडियावर एकच चर्चा सुरू केली. या जेवनावळीत कोण अधिकारी होते, कोण राजकीय नेते व पदाधिकारी होते याची चर्चा रंगली आहे. लॉकडाऊनच्या निर्देशांचे भंग करीत ही जेवनावळ दिली गेली आणि त्यात उपस्थितांच्या संख्येचीही मर्यादा भंग केला गेल्याचा आरोप होत आहे. ज्या ठिकाणी ही जेवनावळ झाली ते फार्म हाऊस एका राजकीय नेत्याचे आहे. त्यामुळे त्याला अधीकच वलय निर्माण झाले आहे.
मनसेकडून चौकशीची मागणी
याबाबत मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे निवेदन दिले आहे. एकीकडे लॉकडाऊन, संचारबंदीचे नियम तोडल्यास सर्वसामान्यांवर थेट गुन्हे दाखल होऊन दंड वसूल केला जात आहे. दुसरीकडे राजकीय नेत्यांनी आपले वजन वापरून नियमभंग केल्यावर कुठलीही कारवाई होत नाही. हा दुजाभाव आहे. एकीकडे जिल्हा प्रशासन कोरोना रोखण्यासाठी जीवापाड मेहनत घेत आहेत. दुसरीकडे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरविले जात असल्याचे या निवेदनात जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, उपजिल्हाध्यक्ष ईश्वर ठाकुर , सचिव पवन गवळे म्हटले आहे.
परवाणगी घेवूनच कार्यक्रम
मुलाच्या लग्नाची जेवनावळ ही नियमानुसार परवाणगी घेवूनच आयोजित करण्यात आली. शिवाय येथे जेवन तयार करणारा खानसामा हा सुरत येथून आलेला होता. कोरोना पॉझिटिव्ह खानसामा त्या दिवशी उपस्थित नव्हता असा दावा आयोजक तथा नगरसेवक खान परवेज करामतभाई यांनी केला आहे.
याबाबत त्यांनी पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. मुलाचे लग्न घरगुती स्वरूपात झाले. त्यानंतर ७ जून रोजी झराळी येथे स्रेह भोजन ठेवले. त्यासाठी ४ जून रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून रितसर परवाणगी घेण्यात आली. या ठिकाणी जो खानसामा बोलविण्यात आला होता तो सुरत येथील होता. पॉझिटिव्ह रुग्ण असलेला खानसामा हा आमचा नातेवाईक असला तरी त्यांच्याशी १ जूनपासून संपर्क नव्हता. त्यांना हृद्ययाचा त्रास असल्याने ते उपचारासाठी गेलेले होते. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह खानसामा जेवनावळी तयार करण्यासाठी होता हा आरोप निराधार आहे. कार्यक्रमात ५० लोकांपेक्षा अधीक जण नव्हतेच. कुठल्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही. कुठल्याही चौकशीस आपण तयार असल्याचेही या पत्रकात खान परवेज करामतभाई यांनी म्हटले आहे.

Web Title: The corporator's son's wedding dinner took on a political color