शुभेच्छा संदेशांवरही ‘कोरोना’चे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 13:23 IST2020-03-27T13:23:15+5:302020-03-27T13:23:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : हिंदू नववर्षाचा प्रारंभ असणाऱ्या गुढीपाडवा या सणावर आणि यानिमित्ताने आलेल्या शुभेच्छा संदेशातही कोरोनाचे सावट ...

Corona's greetings even on greetings | शुभेच्छा संदेशांवरही ‘कोरोना’चे सावट

शुभेच्छा संदेशांवरही ‘कोरोना’चे सावट

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : हिंदू नववर्षाचा प्रारंभ असणाऱ्या गुढीपाडवा या सणावर आणि यानिमित्ताने आलेल्या शुभेच्छा संदेशातही कोरोनाचे सावट दिसून आले.
हिंदू धर्मात गुढीपाडव्यापासून नववर्षाची सुरवात होते. गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या सणाला खूप महत्व आहे. गुढीपाडव्यास मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने विशेषत: महिला व मुलांचा आनंदाचा दिवस असतो. यंदाचा गुढीपाडवा मात्र कोरोनामुळे सर्वांसाठी नैराश्याचा झाला. प्रत्येक गुढीपाडव्यास वाहनांची, कापडांची, दागिन्यांची खरेदी होत असल्याने व्यापाऱ्यांची चंगळ असायची. या वेळी मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने नागरिकांना खरेदीच करता न आल्याने व्यापाºयांचे मोठे नुकसान झाले. गुढीपाडव्याला घरोघरी गुढ्या उभारल्या जातात. या गुढ्यांना हार-कंगण लावले जातात. दरवर्षी हार- कंगणचा व्यवसायही मोठ्या प्रमाणावर होतो. यावेळी या व्यवसायावरही संक्रांत आली. नागरिकांना हार-कंगण न मिळाल्याने यंदा केवळ फुलांच्या माळा घालून गुढी उभारण्यात आली.
गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरु होत असल्याने संदेशाची देवाणघेवाण होते. बुधवार, २५ मार्चपासून श्री शालिवाहन शके १९४२ चा प्रारंभ झाला. नववर्ष व गुढीपाडवानिमित्त यंदाही सोशल मिडियावर शुभेच्छा संदेशांचा अक्षरश: पाऊस पडला. मात्र यावेळी या शुभेच्छा संदेशावरही कोरोनाचे सावट दिसून आले. गुढीपाडव्याच्या संदेशात जगावरील कोरोनाचे संकट टळू दे म्हणून काहींनी देवाकडे प्रार्थना केली तर काहींनी या संकटाच्या काळात ज्यांच्यामुळे आम्ही सुखात घरात आहोत त्या सर्व डॉक्टर, नर्स, वॉर्ड स्टाफ, पोलीस व कर्मचारी यांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनाचे संकट टळून सर्वांना निरोगी आयुष्य लाभो, आज मला हॉस्पिटलच्या रुपात मंदिर तर डॉक्टर व पोलिसांच्या रुपात देव दिसतोय, असेही संदेश शुभेच्छामधून देण्यात आले. नवीन वर्षात देशावरील कोरोनाचे संकट दूर होवो आणि प्रत्येकाला या रोगाशी लढण्याचे बळ मिळो, असाही संदेश गुढीपाडव्याच्या शुभेच्छांमधून देण्यात आला.

Web Title: Corona's greetings even on greetings