प्रकाशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:30 IST2021-03-18T04:30:03+5:302021-03-18T04:30:03+5:30

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ६० वर्षे वयोगटाच्या पुढील वयोवृद्धांना कोरोनाची लस देण्यास प्रारंभ झाला असून, यावेळी १३५ जणांना लस देण्यात ...

Corona vaccination at the primary health center at Prakasha | प्रकाशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण

प्रकाशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ६० वर्षे वयोगटाच्या पुढील वयोवृद्धांना कोरोनाची लस देण्यास प्रारंभ झाला असून, यावेळी १३५ जणांना लस देण्यात आली आहे. लस दिल्यानंतर रुग्णांना अर्ध्या तासापर्यंत डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आले होते. त्यानंतर प्रत्येकाला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

लस घेण्यासाठी सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावे लागते. रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक आदी पुराव्यासाठी लागते. रजिस्ट्रेशन झाल्यावर लसीकरण केले जाते. लस दिल्यानंतर दवाखान्याच्या हॉलमध्ये बसण्याची व झोपण्याची व्यवस्था केलेली होती.

दरम्यान आरोग्य केंद्राकडून सोमवार, बुधवार, आणि शुक्रवार असे आठवड्यातून तीन दिवस लसीकरण करण्यात येणार आहे. याठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून लवकरात लवकर लस कशी दिली जाईल याचे नियोजन होणे आवश्यक आहे. प्रकाशा येथे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मार्च महिन्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, गावात भीतीचे सावट निर्माण झाले आहे. मार्चमध्ये आठवडे बाजार, चिंतामणी महादेव मंदिर परिसर व भुतातळी परिसरात पुन्हा तीन ते चार रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर गावात घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. मात्र कोरोनाचे रुग्ण वाढू नये यासाठी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याकडून उपाययोजना सुरू आहेत.

अनेकांच्या आधार कार्डवर चुकीची जन्मतारीख आहे. त्यामुळे त्यांना लसीकरणापासून दूर राहावे लागत आहे. गावात वयोवृद्धांची संख्या अधिक असल्याने त्यांचा मतदान व आधार कार्डवर चुकीची जन्मतारीख टाकलेली असल्याने ते वयात बसत नाही. त्यामुळे त्यांना या लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे. ज्यावेळेस आधार कार्ड दुरुस्त होईल त्याच वेळेस त्यांना लसीकरण करण्यात येईल.

Web Title: Corona vaccination at the primary health center at Prakasha