प्रकाशा येथे व्यावसायिकांची कोरोना तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:29 IST2021-05-15T04:29:07+5:302021-05-15T04:29:07+5:30

प्रकाशा गाव आधीच कोरोनामुक्त झाले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अहवालानुसार गावात २५ एप्रिलपासून आजपर्यंत कोरोना रुग्ण नाही. गावात कोरोना ...

Corona inspection of professionals at Prakasha | प्रकाशा येथे व्यावसायिकांची कोरोना तपासणी

प्रकाशा येथे व्यावसायिकांची कोरोना तपासणी

प्रकाशा गाव आधीच कोरोनामुक्त झाले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अहवालानुसार गावात २५ एप्रिलपासून आजपर्यंत कोरोना रुग्ण नाही. गावात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी शहादा उपविभागीय अधिकारी यांच्या परिपत्रकानुसार प्रकाशा हे बाजारपेठेचे गाव असल्याने येथील व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली. त्यानुसार ज्यांची कोरोना चाचणी होईल त्यांनाच गावात व्यवसाय करता येईल, असा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला व आरोग्य केंद्राच्या सहकार्याने येथील ग्रामपंचायत हॉलमध्ये रॅपिड अँटिजन चाचणी शिबिर घेण्यात आले. त्यात गावातील लहान-मोठे व्यापारी, किराणा दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, चहा टपरी, भाजीपाला विक्रेते व इतर व्यवसाय करणाऱ्या १५८ व्यापाऱ्यांनी कोविड चाचणी करून घेतली. त्यात सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. ही गावासाठी सुखदायी बाब आहे. तपासणी झालेल्या व्यावसायिकांनी आरोग्य विभागामार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे ज्यांच्याकडे प्रमाणपत्र असेल त्यांनाच आता व्यवसाय करता येईल, असे ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितले आहे. रॅपिड अँटिजन किट संपल्यामुळे उर्वरित व्यापाऱ्यांची तपासणी किट आल्यावर पुढील एक-दोन दिवसात होणार असल्याचे सांगण्यात आले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक बावस्कर, समुदाय आरोग्य अधिकारी मनोज बिरारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रकाश नाईक यांनी ही चाचणी केली. या वेळी सरपंच सुदाम ठाकरे, ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील, तलाठी डी.एम. चौधरी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विजय जैन, ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Corona inspection of professionals at Prakasha