भाजपतर्फे २६ रोजी ‘चक्का जाम’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST2021-06-22T04:21:17+5:302021-06-22T04:21:17+5:30

नंदुरबार : ओबीसी आरक्षण अबाधित राहावे यासह इतर मागण्यांसाठी भाजपतर्फे २६ जून रोजी जिल्हाभरात ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येणार ...

BJP's 'Chakka Jam' agitation on 26th | भाजपतर्फे २६ रोजी ‘चक्का जाम’ आंदोलन

भाजपतर्फे २६ रोजी ‘चक्का जाम’ आंदोलन

नंदुरबार : ओबीसी आरक्षण अबाधित राहावे यासह इतर मागण्यांसाठी भाजपतर्फे २६ जून रोजी जिल्हाभरात ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विजय चौधरी यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यात आणखी समस्या निर्माण झाली आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित राहावे, ही आमची मागणी आहे. याशिवाय टक्केवारीनुसार आरक्षण कायम ठेवून लोकसंख्येनुसार ओबीसी समाजाला आर्थिक तरतूद लागू करावी, अशीही मागणी अनेक दिवसांपासूनची आहे.

ओबीसींमधील अनेक समाज हे गरीब व वंचित आहेत. त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि त्यांच्या आरक्षणाच्या हक्कासाठी ही भूमिका घेण्यात आली आहे. राज्य शासनाच्या बोटचेपे धोरणामुळे ओबीसींचे पारंपरिक चालत आलेले आरक्षण धोक्यात आले आहे. ओबीसींना त्यांचा न्याय मिळाला नाही, तर भाजपतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.

त्याचा पहिला टप्पा हा चक्का जाम आंदोलनाचा आहे. २६ जूनरोजी जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत प्रशासनालादेखील कळविण्यात आले आहे. आंदोलनात जिल्हाभरातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या आंदोलनासह राज्यातील मंत्र्यांना रस्त्यावरदेखील फिरू दिले जाणार नाही. या आंदोलनाचेही नियोजन करण्यात येणार असल्याचे विजय चौधरी यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: BJP's 'Chakka Jam' agitation on 26th