शाडू मातीपासून मूर्तीचे प्रशिक्षण देणारी भारती पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:50 PM2020-08-14T12:50:26+5:302020-08-14T12:50:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना घेऊन गेल्या चार वर्षांपासून शहाद्यातील भारती विनायक पवार ह्या तरुणीने सुमारे ...

Bharti Pawar teaching sculpture from shadu clay | शाडू मातीपासून मूर्तीचे प्रशिक्षण देणारी भारती पवार

शाडू मातीपासून मूर्तीचे प्रशिक्षण देणारी भारती पवार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना घेऊन गेल्या चार वर्षांपासून शहाद्यातील भारती विनायक पवार ह्या तरुणीने सुमारे एक हजारापेक्षाही अधिक जणांना शाडू मातीपासून गणपती बनविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. विशेषत: त्यातून अनेक जण आता स्वयंरोजगाराकडे वळले असून पर्यावरणपूरकची संकल्पना आता या युवकांना आत्मनिर्भर बनवीत आहे.
शहादा येथील भारती पवार ह्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या. त्या स्वत: कलाकार असून त्यांना मूर्ती बनविणे व इतर आर्टचे चांगले ज्ञान आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीपासून पर्यावरणाची प्रेरणा घेत आणि स्वत:च्या कलेतून मूर्ती निर्मितीची संकल्पना घेत त्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जनजागृती सुरू केली. गेल्या चार वर्षांपासून त्या या कार्यात सक्रीय आहेत. विशेषत: शाडू मातीपासून गणपती बनविण्याबाबतचे त्या प्रशिक्षणही घेत आहेत. गेल्या चार वर्षात सुमारे ५० पेक्षा अधिक कार्यशाळा त्यांनी घेतल्या असून त्यातून एक हजारपेक्षाही अधिक जणांना हे प्रशिक्षण दिले आहे. जिल्ह्यातील विविध शाळांमध्येही त्यांनी विद्यार्थ्यांना सामूहिक प्रशिक्षण दिले आहे.
आपल्या या कलेसंदर्भात भारती पवार यांनी सांगितले की, त्यांनी व्यावसायिक मूर्तीकारांकडून मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. सुरुवातीला त्यांनी स्वत:च्या घरासाठी शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवली. त्यानंतर लोकांपर्यंत ही मोहीम पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला. काही जणांना याबाबत सांगितले, प्रशिक्षण दिले. पुढे त्याचा प्रतिसाद पाहता स्वतंत्र कार्यशाळा सुरू केली. या कार्यशाळेतून प्रशिक्षण घेतलेले अनेक तरुण दरवर्षी शाडू मातीपासून गणपती मूर्ती बनविण्याचा व्यवसायही करतात. त्यांना त्यातून रोजगार उपलब्ध होत आहे. त्यामुळे आता तरुणांना आत्मनिर्भर करण्याची प्रेरणादेखील या उपक्रमातून मिळाली आहे. गणेश मूर्तीबरोबरच रांगोळी, पेंटींग, कपड्यावरील कला, मेहंदी याचेही प्रशिक्षण देत असून त्यातूनही अनेकांना रोजगार मिळाला आहे.

यावर्षी कोरोनाचे संकट आल्याने कार्यशाळा आॅनलाईन घेतल्या. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदादेखील आपल्या संपर्कातील किमान एक हजारपेक्षा अधिक जण शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीची स्थापना करणार आहेत. आपणही यावर्षी अनेक मूर्ती साकारली आहेत. यंदा खास करून राम मंदिराचे भूमिपूजन ही ऐतिहासिक घटना होती. त्यामुळे श्रीरामाच्या अवतारातील गणेश मूर्ती बनवली आहे. याशिवाय बालगणेश, शंकर पिंड आदी विविध आकारातील गणेश मूर्ती साकारल्या आहेत.
-भारती पवार,
मूर्तीकार, शहादा.

Web Title: Bharti Pawar teaching sculpture from shadu clay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.