अक्कलकुवा ग्रा.प.गैरव्यवहार आज अहवाल शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 11:59 IST2021-02-15T11:59:19+5:302021-02-15T11:59:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील बहुचर्चित अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील ४ कोटी ७५ लाख रूपयांच्या गैरव्यवहारप्रकरणाची चाैकशी विस्तार अधिका-यांच्या त्रिस्तरीय ...

Akkalkuwa GRP malpractice report possible today | अक्कलकुवा ग्रा.प.गैरव्यवहार आज अहवाल शक्य

अक्कलकुवा ग्रा.प.गैरव्यवहार आज अहवाल शक्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील बहुचर्चित अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील ४ कोटी ७५ लाख रूपयांच्या गैरव्यवहारप्रकरणाची चाैकशी विस्तार अधिका-यांच्या त्रिस्तरीय समितीने शनिवारी रात्री उशिरा पूर्ण केली. त्यांनी केलेल्या चाैकशीचा अहवाल वरिष्ठांकडे देण्यात आला असून मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अहवालाची तपासणी करुन अंतिम निर्णय देणार आहेत. 
   यामुळे दोघा अधिका-यांच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे. अक्कलकुवा ग्रामपंचायतीत २०१६ ते २०२० या काळात पाच टक्के पेसा निधी व चाैदाव्या वित्त आयोगातील निधीचा बेहिशोबी व मनमानी पद्धतीने खर्च करुन विकास कामे केल्याचे दर्शवण्यात आले होते. यातून ग्रामपंचायतीत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी वाढल्याने २०२० मध्ये चाैकशी समिती नियुक्त करुन ग्रामपंचायतीचे दप्तर व इतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती. यातून ९ जणांच्या कार्यकाळात गैरव्यवहार दिसून येत असल्याने त्यांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. नोटीसा देण्यात आलेल्यांमध्ये दोन माजी सरपंच, एक उपसरपंच, दोन प्रशासक, दोन ग्रामविकास अधिकारी, एक ग्रामसेवक आणि विद्यमान सरपंच अशा ९ जणांचा समावेश होता. या सर्वांनी नोटीसा मिळाल्यानंतर समितीला दिलेले खुलासे हे परिपूर्ण नसल्याने त्यांना पुन्हा नोटीसा देत १० फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेत पाचारण करण्यात आले होते. याठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून चाैकशी सुरु होती. शनिवारी रात्री उशिरापर्यंत २०१८-१९ व २०१९-२० या दोन वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यातून तीन दिवसाच्या चाैकशीचा अहवाल तयार करुन तो मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आला आहे. सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अहवालाचे अवलोकन करुन पुढील निर्णय घेणार आहेत.

Web Title: Akkalkuwa GRP malpractice report possible today