विसरवाडीच्या ६४ वर्षीय आजीबाईची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:31 IST2021-05-08T04:31:28+5:302021-05-08T04:31:28+5:30

विसरवाडी येथील दिनेश प्रकाश जयस्वाल यांच्या आई रज्जूबाई प्रकाश जयस्वाल (६४) यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सीटी स्कॅन करण्यासाठी ...

A 64-year-old grandmother from Visarwadi defeated Corona | विसरवाडीच्या ६४ वर्षीय आजीबाईची कोरोनावर मात

विसरवाडीच्या ६४ वर्षीय आजीबाईची कोरोनावर मात

विसरवाडी येथील दिनेश प्रकाश जयस्वाल यांच्या आई रज्जूबाई प्रकाश जयस्वाल (६४) यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सीटी स्कॅन करण्यासाठी धुळे येथे दाखल करण्यात आले. त्यात त्यांचा सीटी स्कॅन स्कोर २१ आला. या वेळी जयस्वाल कुटुंब अक्षरश: घाबरले होते. त्यांनी तत्काळ नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन भदाणे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी त्वरित नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचे सांगितले. १६ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करून महिला कोविड वाॅर्डात रज्जूबाईंवर उपचार सुरू करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी त्यांचा सीटी स्कॅन स्कोर २१ होता तर ऑक्सिजनची पातळी ८७ च्या खाली खालावलेली होती. त्यामुळे त्यांना श्वास घेताना त्रास होत होता. तसेच अस्वस्थ वाटत होते. आधीच पितृछत्र हरवलेले असताना आईवर कोरोनाचे संकट ओढवल्याने दिनेश जयस्वाल हे मात्र फारच घाबरलेल्या अवस्थेत होते. पण रज्जुबाई जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नियमित उपचार करून घेतला. डॉक्टरांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शनामुळे त्यांचे मनोधैर्य त्यांनी खचू दिले नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत रज्जूबाई जयस्वाल हसत-खेळत ठणठणीत बऱ्या होऊन १५ दिवसांनंतर घरी परतल्या.

नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात रज्जूबाई यांच्यावर झालेल्या उपचाराबाबत त्यांनी डॉ.राजेश वसावे, डॉ.सचिन भदाणे, डॉ.राजेंद्र चौधरी व तेथील सर्व कर्मचाऱ्यांचे साश्रूनयनांनी आभार मानले. डाॅक्टरांचे मार्गदर्शन, योग्य व वेळेवर औषधोपचार आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास कोरोना झाल्यावर घाबरून न जाता मृत्यूच्या दाढेतूनही परत येता येते, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: A 64-year-old grandmother from Visarwadi defeated Corona