१९० कोटी खर्चून निर्माण झाले ३४ लाख टीसीएम पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 09:57 PM2020-08-13T21:57:48+5:302020-08-13T21:57:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : २०१५ मध्ये सुरू झालेले जलयुक्त शिवार अभियान मार्च २०२० पासून बंद करण्यात आले आहे़ ...

34 lakh TCM of water was generated at a cost of Rs 190 crore | १९० कोटी खर्चून निर्माण झाले ३४ लाख टीसीएम पाणी

१९० कोटी खर्चून निर्माण झाले ३४ लाख टीसीएम पाणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : २०१५ मध्ये सुरू झालेले जलयुक्त शिवार अभियान मार्च २०२० पासून बंद करण्यात आले आहे़ राज्यातील सर्व यंत्रणांनी सर्व कामे पूर्ण केल्याचे गृहित धरून शासनाने ही योजना बंद केली आहे़ तब्बल पाच वर्षे सुरू असलेल्या या अभियानात जिल्ह्यातील विविध यंत्रणांनी १९० कोटी रूपयांचा खर्च करुन ३४ लाख टीसीएम पाणीसाठा निर्माण केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे़
२०१५ या वर्षात नंदुरबार ७२ गावांची निवड करत त्याठिकाणी विविध जलसंधारणाच्या कामांची सुरूवात केली होती़ यांतर्गत सुमारे ४९२ कामे कृषी विभाग, लघुसिंचन विभाग, जलसंधारण विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि भूजल सर्वेक्षण विभाग यांच्याकडून सुरू करण्यात आली होती़ यात नंदुरबार सात गावांमध्ये १०९ कामे, धडगाव ३ गावांमध्ये ५८ कामे, नवापूर ३२ गावांमध्ये ९४, शहादा १६ गावांमध्ये ८३ तर अक्कलकुवा तालुक्यात १२ गावांमध्ये १४८ कामांना सुरूवात करण्यात आली होती़ ही कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आल्यानंतर २०१६ या कामांना वेग येऊन ४२५ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाचे पाणी पोहोचल्याचे सांगण्यात आले आहे़ पाणलोट विकास कार्यक्रम, गॅबियन बंधारे, अनघड दगडी बांध, नैसर्गिक जलस्त्रोत बळकटीकरण, वनीकरण, वृक्षलागवड, सिमेंट नाला बांध, कंपार्टमेंट बंडीग, मातीनाला बांध, गाळ काढणे, नाला खोलीकरण, कोल्हापूर टाईप बंधारा, साठवण बंधारा, जुन्या जलस्त्रोतांची दुरूस्ती, खोल सलग समतल चर, लहान मातीचा बांध, मजगी यासह विविध जलसंधारणाची कामे गेल्या पाच वर्षात पूर्ण करण्यात आली आहेत़ ही कामे पूर्ण करणाऱ्या यंत्रणांनी कृषी विभागाकडे तसा अहवाल देऊन कामांची माहिती दिली आहे़ यातून निर्माण झालेल्या पाण्यातून भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा विविध यंत्रणांनी केला आहे़

२०१५-१६ ते २०१८-१९ या वर्षात कृषी विभाग, लघुसिंचन विभाग, जलसंधारण विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, भूजल सर्वेक्षण विभाग यांनी मिळून ४२५ गावांची निवड केली आहे़ यात ९ हजार २३६ कामे हाती घेण्यात आली होती़ यासाठी जिल्हा नियोजनसह विविध यंत्रणांनी २६७ कोटी ९३ लाख रूपयांचा निधी मंजूर करुन दिला होता़ या निधीतून सर्व ९ हजार २३६ कामे आजअखेरीस पूर्ण करण्यात आल्याचा दावा या सर्व यंत्रणांकडून करण्यात आला असून यासाठी १९० कोटी ८ लाख ९४ हजार रूपयांचा निधी खर्च करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे़ खर्च करण्यात आलेल्या निधीतून तयार झालेल्या जलसंधारणाच्या कामातून ३४ लाख ३६८ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे़ यातून भूजल पातळी दीड मीटरपर्यंत स्थिर आहे़

जिल्ह्यात पूर्ण ९ हजार कामांचा आढावा दर वर्षाला घेण्यात येणार आहे़ दरम्यान जलयुक्त शिवार अभियान हे केवळ पाच वर्षांसाठी होते़ एप्रिल २०१९ ही त्याची शेवटची मुदत होती़ परंतु बरीच कामे अपूर्ण असल्याने त्याला मार्च २०२० पर्यंत मुदतवाढ दिली गेली़ मुदत वाढ मिळाल्याने बरीच कामे पूर्ण करण्यात आल्याने जिल्ह्यातील ही योजना पूर्णपणे गुंडाळण्यात आली आहे़


३१ मार्च २०२० रोजी अभियान पूर्ण झाले आहे़ जिल्ह्यातील सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत़ कामे पूर्ण झाली असल्याची दर वर्षाला तटस्थ यंत्रणा तपासणी करणार आहे़ याचा अहवाल विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात देवून कार्यवाही सुरू राहील़
-निलेश भागेश्वर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नंदुरबाऱ

Web Title: 34 lakh TCM of water was generated at a cost of Rs 190 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.