थकबाकीमुळे उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:52 PM2019-04-29T23:52:56+5:302019-04-29T23:55:46+5:30

जिल्हा परिषदेकडून ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी आरक्षित केलेल्या पाण्यासाठी अग्रीम पाणीपट्टी न भरल्याने उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून यापुढे पाणीपुरवठा केला जाणार नाही, असे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. १ कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

water supply stop from the upper Painganga project Due to the bill unpaid | थकबाकीमुळे उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून पाणीपुरवठा बंद

थकबाकीमुळे उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून पाणीपुरवठा बंद

googlenewsNext
ठळक मुद्देअग्रीम पाणीपट्टी जिल्हा परिषदेकडे थकले पाटबंधारे विभागाचे ५६ कोटी ५५ लाख

नांदेड : जिल्हा परिषदेकडून ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी आरक्षित केलेल्या पाण्यासाठी अग्रीम पाणीपट्टी न भरल्याने उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून यापुढे पाणीपुरवठा केला जाणार नाही, असे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. १ कार्यालयाने स्पष्ट केले आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा न करण्याच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे.
उर्ध्व पैनगंगा प्रकल्प अर्थात इसापूर धरणातून २०१८-१९ साठी नांदेड जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यासाठी ३५ दलघमी पाणी आरक्षित केले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दरवर्षी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाकडून बिगरसिंचन पाणी सोडण्यात येते.
आरक्षित करण्यात आलेल्या पाण्याचे पैसे जिल्हा परिषद कार्यालयाकडून अद्याप भरण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे, जून २०१८ अखेर नांदेड जिल्हा परिषदेकडे ५५ कोटी ८२ लाख रुपये तसेच सन २०१८-१९ साठी आरक्षित पाण्याच्या ५० टक्के अग्रीम पाणीपट्टीपोटी ६३ लाख रुपये असे एकूण ५६ कोटी ५५ लाख रुपये थकित आहेत. यापैकी केवळ १६ लाख रुपये जिल्हा परिषदेने भरले आहेत.
शासन निर्णयाप्रमाणे आरक्षित पाण्याची अग्रीम पाणीपट्टी जलसंपदा विभागाकडे भरणे आवश्यक असतानाही संबंधित कार्यालयाने थकीत व अग्रीम पाणीपट्टीची रक्कम भरणा न केल्यामुळे यापुढे कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र १ नांदेड या कार्यालयाकडून पाणीपुरवठा केला जाणार नाही असे उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता नांदेड यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाची धावपळ उडत आहे. जिल्ह्यात जवळपास ८० टँकर सुरु आहेत. भर उन्हाळ्यात उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्हा परिषदेसह जिल्हा प्रशासनाचीही तारांबळ उडणार आहे. यावर्षी उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यातच गतवर्षी पावसाचे प्रमाणही कमी राहिले होते. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
दक्षिण नांदेड शहरातही पाणीबाणी
नांदेड शहरातही पाणीबाणी निर्माण झाली आहे. दक्षिण नांदेडला पाणीपुरवठा करताना महापालिकेची कसरत सुरु आहे. त्यातच इसापूर प्रकल्पातून पर्यायी पाणीपुरवठा योजनेसाठी चौथ्या टप्प्यातील पाणी घेण्यात येत असल्याने उत्तर नांदेडचा पाणीप्रश्न काहीअंशी का होईना सुटला आहे. पण दक्षिण नांदेडवर आता पाणीसंकट ओढवले आहे. त्यातच पाणी घेण्यासाठी पर्यायी प्रकल्पही कोरडे झाल्याने आहे त्याच पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागत आहे. मनपाने दोनऐवजी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच विष्णूपुरीतील अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी पथकांची गस्तही सुरु केली आहे. प्रकल्प क्षेत्रातील विद्युतपंपाचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे अवैध पाणी उपशावर काही प्रमाणात का होईना नियंत्रण आले आहे.

Web Title: water supply stop from the upper Painganga project Due to the bill unpaid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.