राज्याचे नेतृत्व करण्याची संधी, तरीही भोकर विकासापासून कोसोदूर: प्रताप पाटील चिखलीकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 13:55 IST2025-10-18T13:54:37+5:302025-10-18T13:55:22+5:30
भोकर मतदारसंघाच्या विकासावर आमदार चिखलीकर आक्रमक; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत टीका

राज्याचे नेतृत्व करण्याची संधी, तरीही भोकर विकासापासून कोसोदूर: प्रताप पाटील चिखलीकर
अर्धापूर (जि.नांदेड) : राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळून देखील भोकर मतदारसंघ विकासापासून कोसोदूर आहे. राष्ट्रवादी पक्ष जिल्ह्यासह अर्धापूर व भोकर मतदारसंघात नंबर एकवर राहणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निवडून पंचवीस वर्षांत जो विकास झाला नाही, तो पाच वर्षांत करून दाखवू. तालुक्यातील तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार. तुम्ही सांगाल त्यांना उमेदवारी दिली जाईल, असे प्रतिपादन आमदार प्रतापराव चिखलीकर यांनी केले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्धापूर येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास माजी आ. मोहन हंबर्डे, मा.आ.सुभाष साबणे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर, कार्याध्यक्ष माधव पावडे, स्वप्नील इंगळे, सुनील नानवटे, रोहन कांबळे, अमोल मालेगावकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमात शेनीचे पुरभाजी धुमाळ, शादुल भाई, वसीम मुल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रवेश केला. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष आत्माराम कपाटे यांनी केले.