तरुण-तरुणीची आत्महत्या

By Admin | Updated: November 15, 2014 02:46 IST2014-11-15T02:46:27+5:302014-11-15T02:46:27+5:30

तालुक्यातील केसलापूर येथील तरुणाने गळफास लावून तर तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.

Young and Young Suicide | तरुण-तरुणीची आत्महत्या

तरुण-तरुणीची आत्महत्या

मौदा : तालुक्यातील केसलापूर येथील तरुणाने गळफास लावून तर तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. सदर घटनेबाबत गावात तर्कवितर्क लावले जात असून, हा प्रकार प्रेमप्रकरणातून घडला असावा, अशी शक्यता काहींनी व्यक्त केली आहे.
अश्विन नागोराव नखाते (१९) व अंकिता गौतम तांबे (१६) दोघेही रा. केसलापूर, ता. मौदा अशी मृत तरुण-तरुणीची नावे आहेत. अंकिताने गुरुवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास आईसोबत जेवण केले आणि नंतर झोपी गेली. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास तिच्या आईला जाग आली. तिला अंकिता घरात नसल्याचे लक्षात येताच याबाबत घरच्या मंडळींना सांगितले. त्यामुळे तिचा शोध घेण्याचाही प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, ती शेजारी असलेल्या घराच्या स्नानगृहात पडली असल्याचे निदर्शनास आले. तिला लगेच नागपूरला हलविण्यात आले. मात्र, वाटेतच तिचा मृत्यू झाला.
अश्विन हा अंकिताच्या घराजवळच राहतो. त्याने पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घरालगत असलेल्या गोठ्याच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी अश्विनचे वडील साफसफाई करण्यासाठी गोठ्यात गेले असता त्यांना अश्विन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मौदा पोलिसांनी दोन्ही घटनांचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले.
विशेष म्हणजे, अंकिता व अश्विन या दोघांचीही घरे जवळजवळ आहेत. हा प्रकार प्रेमप्रकरणातून घडला असावा, अशी शक्यता स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी मौदा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Young and Young Suicide