भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई

By योगेश पांडे | Updated: December 16, 2025 00:03 IST2025-12-16T00:02:47+5:302025-12-16T00:03:33+5:30

भाजपचे ‘मिशन १२०’ तर काँग्रेसकडून दमदार वापसीसाठी प्रयत्न

Will BJP's winning four or Congress be the 'game changer'? A battle for survival for Shiv Sena, NCP | भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई

भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: बहुप्रतिक्षित नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या तारखा अखेर घोषित झाल्या आहे. २००७ पासून सत्तेवर असलेल्या भाजपकडून १२० जागांचे लक्ष्य ठेवून विजयी चौकार मारण्यावर भर देण्यात येत आहे. तर काँग्रेसकडून भाजपचा गड भेदत येथील मतदारांचा मतदार परत मिळविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. दुसरीकडे एकेकाळी नागपुरातील बऱ्याच वस्त्यांमध्ये प्रभाव असलेल्या बसपासोबतच शिवसेना, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठीदेखील ही मोठी परीक्षा ठरणार आहे.

२०१७ साली झालेल्या निवडणूकीत भाजपने १५१ पैकी १०८ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता काबीज केली होती. काँग्रेसला २९ जागांवर समाधान मानावे लागले होते. बसपाला १०, शिवसेना २, राष्ट्रवादी व अपक्ष प्रत्येकी एका जागांवर विजयी झाले होते.मात्र २०२२ पासून निवडणूक रखडली व मनपात प्रशासक राज आले. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी निवडणूक जाहीर केल्याने इच्छुक आता सरसावले आहेत.

२०१७ नंतर नागपुरात दोन लोकसभा व विधानसभा निवडणूका झाल्या. त्यात मतदारांनी भाजपलाच झुकते माप दिल्याचे दिसून आले असले तरी उत्तर व पश्चिम नागपुरात काँग्रेसचे वर्चस्व कायम असल्याचे चित्र दिसून आले. सर्वच पक्षांनी निवडणूकीसाठी अगोदरच नियोजनाला सुरुवात केली होती. भाजपकडूनदेखील मागील आठ‌वड्यातच अर्जवाटप करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून ‘आऊट ऑफ रिच’ असलेले माजी नगरसेवक आता जनतेत मिसळू लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

असे होते २०१७ चे चित्र

भाजप : १०८
काँग्रेस : २९
बसपा : १०
शिवसेना : २
राष्ट्रवादी : १
अपक्ष : १

भाजपच्या हेविवेट नेत्यांची परीक्षा

मागील काही निवडणूकांपासून भाजपची भिस्त ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या कार्यांवरच राहिली आहे. या महानगरपालिका निवडणूकीतदेखील हेच भाजपच्या प्रचाराचे प्रमुख चेहरे राहणार आहेत. भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी १२० जागांवर विजय मिळवू असा दावा केला आहे. त्यादृष्टीने भाजपच्या हेविवेट नेत्यांची ही मोठी परीक्षाच ठरणार आहे.

गटबाजी सारून एकत्रित येणार का काँग्रेस?

एकेकाळी काँग्रेस बालेकिल्ला असलेल्या नागपुरात २००७ पासून भाजपची सत्ता आहे. मागील निवडणूकीत काँग्रेसला २९ जागांवरच समाधान मानावे लागले होते. त्यानंतर झालेल्या दोन विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने चांगली टक्कर दिली. परंतु काँग्रेसमध्ये अद्यापही गटबाजी कायम आहे. त्याचा फटका तिकीट वाटप व प्रचारादरम्यान बसण्याची शक्यता आहे. जुन्या बालेकिल्ल्याला परत मिळविण्यासाठी काँग्रेस नेते एकदिलाने लढतील का यावर बरेच गणित अवलंबून राहणार आहे.

असे आहे आरक्षण

प्रवर्ग : जागा : महिलांसाठी आरक्षित

खुला : ६९ : ३५
ओबीसी : ४० : २०
एससी : ३० : १५
एसटी : १२ : ६

Web Title: Will BJP's winning four or Congress be the 'game changer'? A battle for survival for Shiv Sena, NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.