महाराष्ट्र दर्शनासाठी जात असताना काळाचा घाला; अपघातात ४ तरुण ठार, ५ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 11:07 IST2021-01-05T10:13:23+5:302021-01-05T11:07:28+5:30
सोमवारी सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास हिंगणघाट (जि. चंद्रपूर) येथील छत्रपती शिवाजी मार्केट समोर सदर अपघात झाला.

महाराष्ट्र दर्शनासाठी जात असताना काळाचा घाला; अपघातात ४ तरुण ठार, ५ जखमी
हिंगणघाट: महाराष्ट्र दर्शनासाठी गिरड-हिंगणघाट मार्गाने निघालेल्या चार तरुणांना अपघातात आपला जीव गमवावा लागला, तर या भीषण अपघातात अन्य पाच तरुण जखमी झाले. समोरून येणाऱ्या दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात उभ्या ट्रकला धडक लागल्याने हा अपघात झाला. उमरेड तालुक्यातील हिवरा हिवरी या एकाच गावातील हे चारही तरुण असून गाव परिसरात शोककळा पसरली आहे.
सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास हिंगणघाट (जि. चंद्रपूर) येथील छत्रपती शिवाजी मार्केट समोर सदर अपघात झाला. यामध्ये मोहन राजेंद्र मोंढे (२२), सुरज जयवंत पाल (२०), आदेश हरिभाऊ कोल्हे (१७), शैलेश पंढरी गिरसावळे (२६) या चार तरुणांचा करुण अंत झाला. शुभम प्रमोद पाल (२२), समीर अरुण मोंढे (१७), भूषण राजेंद्र कोल्हे (२४), प्रणय दिवाकर कोल्हे (१७), चैतन्य प्रमोद कोल्हे (१२) अशी पाच जखमींची नावे आहेत. हिवरा हिवरी (ता.उमरेड) येथून काल सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास गावातील एकूण ९ तरुण एमएच ४० केआर ६४८२ क्रमांकाच्या बोलेरो वाहनाने हिगणघटच्या दिशेने निघाले.
छत्रपती शिवाजी मार्केट लगत असताना अचानकपणे एक दुचाकी वाहन समोरून आले. दुचाकी चालकास वाचविण्याच्या प्रयत्नात असताना बोलरोचालक शैलेश गिरसावळे याचा वाहनावरील ताबा सुटला आणि उभ्या ट्रकला जोरदार धडक लागली. सदर मार्ग वळणावर असून घटनास्थळी उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असल्याचीही बाब समोर आली आहे. या अपघातामुळे हिवरा हिवरी परिवारात शोककळा पसरली आहे.