विदर्भात थंड लाटसदृश्य स्थिती ! पुढच्या आठवड्यात थंडीचा कडाका, तापमान सरासरीपेक्षा 'इतके' खाली जाण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 20:20 IST2025-12-05T20:09:44+5:302025-12-05T20:20:03+5:30
भंडारा, गोंदिया १० अंशांवर : विदर्भात पुढचा आठवडा थंडीचा कडाका

Vidarbha sees cold wave conditions! Severe cold wave next week, temperature likely to drop 'much' below average
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काही दिवस दिलासा देणारी थंडी पुन्हा परतली आहे. डिसेंबरचा पहिला आठवडा हुडहुडी भरविणारा ठरला. दोन दिवसांपासून घसरणारा नागपूरचा पारा गुरुवारी ११ अंशांवर गेल्याने गारठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. दुसरीकडे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातही किमान तापमान १० अंशांवर गेले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार तापमानाची घसरण आठवडाभर कायम राहणार असून विदर्भाला थंड लाटसदृश्य स्थितीचा सामना करावा लागू शकतो.
डिसेंबरचा महिना हा तसा थंडीचाच असतो. नोव्हेंबरचे शेवटचे दिवस व डिसेंबरच्या पहिल्या दोन दिवसांत पारा चढल्याने थंडीपासून जरा दिलासा मिळाला होता. मात्र, बुधवारपासून पुन्हा थंडी वाढायला लागली आहे. गेल्या काही दिवसात उत्तर भारतात जबरदस्त थंडी वाढली आहे. जम्मू काश्मीर, दिल्ली, पंजाब ते झारखंडपर्यंत थंड लाटेची स्थिती निर्माण झाली आहे. पंजाबच्या आदमपूर शहरात किमान तापमान ३ अंशांवर गेले आहे. गुरुवारी नागपूरचे रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा २.६ अंशाने कमी होते. भंडारा, गोंदियाचा पारा सरासरीपेक्षा ३ अंशाने कमी आहे. वर्धा, वाशिम व यवतमाळ १२ अंशांवर आहेत, तर अमरावती, अकोला, गडचिरोली १३ अंशांवर आहेत. केवळ चंद्रपूर सर्वाधिक १४ अंशांवर आहे. पुढच्या दोन दिवसात विदर्भातील काही जिल्ह्यांचे किमान तापमान २ ते ३ अंशाने घसरण्याची शक्यता आहे.