वंचित बहुजन आघाडीची स्वबळावर वाटचाल; काँग्रेसने नगर परिषद निवडणुकीत प्रतिसाद न दिल्याने नाराजी
By कमलेश वानखेडे | Updated: December 17, 2025 15:15 IST2025-12-17T15:13:00+5:302025-12-17T15:15:49+5:30
Nagpur : वंचित बहुजन आघाडीने नागपूर महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी वाटचाल सुरू केली आहे. काँग्रेसने नगर परिषद निवडणुकीत आघाडीचा प्रस्ताव देऊनही प्रतिसाद दिला नाही.

Vanchit Bahujan Aghadi moves on its own; Dissatisfaction with Congress's lack of response in the municipal council elections
नागपूर : वंचित बहुजन आघाडीने नागपूर महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी वाटचाल सुरू केली आहे. काँग्रेसने नगर परिषद निवडणुकीत आघाडीचा प्रस्ताव देऊनही प्रतिसाद दिला नाही. यामुळे कुणासोबत आघाडीची वाट न पाहता पुढे जाण्याची भूमिका पक्षाने स्वीकारली आहे.
‘वंचित’ने गेल्या सहा महिन्यात शहरात संघटन उभारणीवर काम केले. आता निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. पक्षातर्फे मंगळवारपासून उमेदवारी अर्ज वाटपास सुरुवात झाली आहे. पक्षाकडे उमेदवारी अर्ज सादर करताना एक हजार रुपये पक्षनिधीच्या रुपात जमा करायचे आहेत. २० तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यानंतर उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती होतील. ख्रिसमसनंतर उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. पक्षाते शहर अध्यक्ष मंगेश वानखेडे लोकमतशी बोलताना म्हणाले, सामान्य नागरिक, तरुण, महिला, ओबीसी, एससी, एसटी व वंचित घटकांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या आमचा प्रयत्न आहे. सर्व संवर्गातील उमेदवारांना प्रतिनिधित्व देण्याचा आमचा प्रयत्न असेल. नगर परिषदेसाठी काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव दिला होता. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेवून चर्चा केली होती. मात्र पुढे काँग्रेसकडून काहीच उत्तर आले नाही. या अनुभवामुळे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसला प्रस्ताव दिलेला नाही. सर्व जागांवर स्वबळावर लढण्याची आमची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या दोन सभा
महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नागपुरात दोन सभा होणार आहेत. यातील एक सभा उत्तर नागपुरात तर दुसरी सभा दक्षिण नागपुरात आयोजित केली जाणार आहे.