कातलाबोडीतील ‘वाघ’ गायब!

By Admin | Updated: May 14, 2014 00:47 IST2014-05-14T00:47:12+5:302014-05-14T00:47:12+5:30

कळमेश्‍वर वन परिक्षेत्रामधील कातलाबोडी जंगलातील एक वाघ गत काही दिवसांपासून अचानक गायब झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे

'Tiger' disappeared in Katalabadi! | कातलाबोडीतील ‘वाघ’ गायब!

कातलाबोडीतील ‘वाघ’ गायब!

जीवन रामावत - नागपूर

कळमेश्‍वर वन परिक्षेत्रामधील कातलाबोडी जंगलातील एक वाघ गत काही दिवसांपासून अचानक गायब झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेने वन विभागात एकच खळबळ माजली असून, त्याचा रात्रंदिवस शोध घेतला जात आहे.

माहिती सूत्रानुसार, येथील जंगलात मागील काही वर्षांपासून एक वाघीण आपल्या दोन बछड्यांसह अधिवास करीत आहे. परंतु गत काही दिवसांपासून त्यापैकी एक बछडा अचानक गायब झाला आहे. त्या वाघाला कुणी तरी विजेचा शॉक देऊन ठार केल्याची चर्चा आहे; शिवाय त्यानंतर त्याला जंगलात कुठेतरी गाडल्याचे बोलले जात आहे. वरिष्ठ वन अधिकार्‍यांपर्यंत या घटनेची माहिती पोहोचताच, सर्वांची झोप उडाली आहे, शिवाय तेवढीच गुप्तता बाळगली जात आहे.

मात्र वन विभागातील बहुतांश वरिष्ठ वन अधिकार्‍यांपर्यंत वाघ गायब झाल्याची माहिती पोहोचली आहे. असे असले तरी वन विभागाच्या हाती अजूनपर्यंत कोणताही ठोस पुरावा लागलेला नाही. त्यामुळे अख्खा वन विभाग दिवस-रात्र एक करून घटनेचा शोध घेत आहे. काही वन अधिकारी तो वाघाचा बछडा दीड वर्षांचा झाल्यामुळे आईला सोडून दुसरीकडे निघून गेला असावा, अशी शंका उपस्थित करून घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र जाणकारांच्या मते, दीड वर्षांंचा वाघ आईला सोडून जाऊ शकत नाही, असे सांगितले जात आहे.

Web Title: 'Tiger' disappeared in Katalabadi!