प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर असेल डिजिटल कोड; टीईटी परीक्षा होणार हायटेक देखरेखीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 14:16 IST2026-05-16T14:15:39+5:302026-05-16T14:16:38+5:30
Nagpur : येत्या २८ जून २०२६ रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तंत्रज्ञानाचा 'ब्रह्मास्त्र' म्हणून वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

There will be a digital code on every question paper; TET exam will be conducted under high-tech supervision
बालाजी देवर्जनकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही महिन्यांत 'नीट' आणि बारावीच्या परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांनी संपूर्ण देशाचे शैक्षणिक क्षेत्र हादरवून सोडले आहे. या पार्श्वभूमीवर येत्या २८ जून २०२६ रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तंत्रज्ञानाचा 'ब्रह्मास्त्र' म्हणून वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
परीक्षेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे 'कस्टम कोटिंग' तंत्रज्ञान. प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर एक विशेष, सूक्ष्म आणि अदृश्य डिजिटल कोड असेल. जर कोणीही प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा प्रयत्न केला, तर तो पेपर नेमका कोणत्या जिल्ह्यातील, कोणत्या केंद्रावरील आणि कोणत्या बाकावरील उमेदवाराचा आहे, याचा शोध अवघ्या काही मिनिटांत लागेल. याव्यतिरिक्त, प्रश्नपत्रिकांची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाला जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा बसविण्यात आली आहे. स्ट्रॉग रूमपासून परीक्षा केंद्रापर्यंतच्या प्रत्येक सेकंदाचा प्रवास 'लाइव्ह' ट्रॅक केला जाणार असून, मार्गात अनधिकृत थांबा घेतल्यास तत्काळ अलार्म वाजण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
यंदा तब्बल ६ लाख उमेदवारांनी नोंदणी केल्याने परीक्षेचे नियोजन दोन टप्प्यांत (प्राथमिक आणि उच्च प्राथमिक) अत्यंत सूक्ष्मपणे करण्यात आले आहे. वाढत्या स्पर्धेमुळे परीक्षेची काठिण्य पातळी ही केवळ घोकंपट्टीवर आधारित न राहता, उमेदवारांच्या तार्किक क्षमता आणि उपयोजनात्मक कौशल्यावर आधारित असेल. पेपरफुटी टाळण्यासाठी मानवी हस्तक्षेपाऐवजी 'एंड-टू-एंड एनक्रिप्शन' आणि बायोमेट्रिक पडताळणी यासारख्या संशोधनात्मक पद्धतींचा अवलंब करण्यात आला आहे.
असा असेल तंत्रज्ञानाचा 'वॉच'
- जॅमरचा वापर : संवेदनशील केंद्रांवर हाय-फ्रीक्वेंसी जॅमर असतील, ज्यामुळे ब्ल्यूटूथ किंवा गॅझेट्स निकामी होतील.
- 'लाइव्ह' वॉर रूम : पुण्यातील मुख्य कार्यालयातून प्रत्येक केंद्राचे सीसीटीव्ही चित्रीकरण थेट पाहिले जाईल.
- ओएमआर सुरक्षा : 3 उत्तरपत्रिकांच्या स्कॅनिंगसाठी प्रगत एआय तंत्रज्ञान वापरले जाणार असून, त्यात फेरफार करणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. सुरक्षा आता केवळ नियमांत नाही, तर सॉफ्टवेअरमध्ये असेल.