लग्न मंडपातून बायको पळाली, अन् नवऱ्याला भोवळ आली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 13:27 IST2024-05-02T13:25:38+5:302024-05-02T13:27:30+5:30
Nagpur : दिराच्या लग्नातून प्रियकरासोबत नवविवाहिता झाली फरार

The wife ran away with a lover from the marriage hall
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : नागपूर जिल्ह्यातील लेकीचे मोहाडी तालुक्यातील गावात लग्न झाले. लेक सासरी नांदायला आली. १५ दिवसांचा संसार केला. परंतु मनात काही वेगळेच होते. २५ एप्रिलला दिराचे लग्न असल्याने सिहोरा परिसरातील एका गावात पतीसोबत आली. रात्री मंगलाष्टके सुरू असताना ती मात्र पूर्वीच्या प्रियकरासोबत फरार झाली. याची वार्ता मंडपात पसरताच एकच खळबळ उडाली.
अंकिता व सुमित असे या कहानीतील पती-पत्नीचे काल्पनिक नाव आहे. २० वर्षीय अंकिताचे लग्न मोहाडी तालुक्यात असणाऱ्या गावातील सुमित नामक मुलासोबत १० एप्रिलला झाले. नववधू सासरी नांदायला आली. पूर्व प्रियकराचे नाते विसरून अंकिताने संसार सुरू केला. दिराच्या लग्नासाठी सासरी परतल्यावर सासरच्या लोकांना जराही शंका येऊ न देता ती वावरली. २५ एप्रिलला दिराच्या लग्नाची धामधूम सुरू झाली. घरात जो तो लग्नाच्या समारंभात गुंतला होता. अंकिताही दिराच्या लग्न समारंभात सकाळपासून सहभागी झाली. पतीच्या खांद्याला खांद्या लावून लग्नाचे सोपस्कार पार पाडले. हे सुरू असताना तिचा मोबाइल मात्र सतत खणखणतच होता. माहेराहून नातेवाइकांचे कॉल येत असावे, असे समजून सर्वांनी दुर्लक्ष केले.
दिराच्या लग्नाची वरात सायंकाळी वधूच्या गावातील लग्नमंडपी पोहोचली. अंकिताही सर्वांसोबत होती. दरम्यान, रात्री ८ वाजताच्या सुमारास मंगलाष्टके सुरू झाली. एवढ्यात तिचा मोबाइल खणखणला. एकीला शौचास जात असल्याचे सांगून ती मंडपातून बाहेर पडली आणि प्रियकरासोबत पोबारा केला.
इकडे वेळ होऊनही अंकिता दिसत नसल्याने शोधाशोध सुरू झाली असता ती फरार झाल्याचे कळले. हे ऐकून सासरच्या कुटुंबीयांना भोवळच आली. लग्न मंडपात धावपळ सुरू झाली. आता तिला पुन्हा घरी नांदायला आणण्यास सुमितने नकार दिला आहे. या घटनेची परिसरात खमंग चर्चा सुरू आहे
अन् त्यांनी घेतला संसार थाटण्याचा निर्णय
लग्नानंतरचे अवघे चार दिवस सुमितच्या घरी घालवून ती १० ते २५ एप्रिलच्या कालावधीत माहेरी मुक्कामाला होती. सासरच्या घरी दिराचे लग्न असल्याने माहेराहून ती परतली. परंतु मनात काही वेगळेच होते. माहेर गावच्या शेजारच्या गावातच अंकिताच्या प्रियकराचे गाव होते. माहेरी गेल्यानंतर तिची भेट प्रियकरासोबत झाली. या भेटीत पतीला सोडून प्रियकरासोबत पळून संसार थाटण्याचा निर्णय घेतला.