सावरगावात रंगला शंकरपटाचा थरार; १८९ बैलजाेड्या सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 11:27 AM2023-03-14T11:27:54+5:302023-03-14T11:29:45+5:30

‘अ’ गटात बैतूल तर ‘ब’ गटात सावरगाव येथील बैलजाेडी अव्वल

The thrill of Shankarpata in Savargaon, 189 bullocks participated | सावरगावात रंगला शंकरपटाचा थरार; १८९ बैलजाेड्या सहभागी

सावरगावात रंगला शंकरपटाचा थरार; १८९ बैलजाेड्या सहभागी

googlenewsNext

याेगेश गिरडकर

सावरगाव (नागपूर) : ७१ वर्षांची परंपरा असलेल्या सावरगाव (ता. नरखेड) येथील दाेन दिवसीय शंकरपटाचा साेमवारी (दि. १३) समाराेप झाला. दाेन गटांत घेण्यात आलेल्या या शंकरपटात पहिल्या दिवशी ८० व दुसऱ्या दिवशी १०९ अशा एकूण १८९ बैलजाेड्या सहभागी करण्यात आल्या हाेत्या. ‘अ’ गटात बैतूल (मध्य प्रदेश) येथील भिसू राठोड यांच्या तर ‘ब’ गटात सावरगाव येथील बगला ग्रुपच्या बैलजाेडीने अव्वल स्थान प्राप्त केले.

साेमवारी ‘अ’ गटात ३६ तर ‘ब’ गटात ७३ बैलजाेड्या धावल्या. ‘अ’ गटात बैतुल येथील भिसू राठोड यांच्या बैलजाेडीने ८.०९ सेकंदांत १०० मीटर अंतर पार करीत प्रथम क्रमांक पटकावला तर वाशिम येथील आतिश वर्मा यांच्या बैलजाेडीने ८.११ सेकंदांत अंतर पार करून दुसरा व त्यांच्याच दुसऱ्या बैलजाेडीने ८.१२ सेकंदांत अंतर पार करून तिसरा क्रमांक पटकावला. ‘ब’ गटात सावरगाव येथील बगला ग्रुपच्या बैलजाेडीने नियाेजित अंतर ८.५५ सेकंदांत पार करून प्रथम, खैरी (ता. काटाेल) येथील मनाेज भाेंडवे यांच्या बैलजाेडीने ८.८१ सेकंदांत पार करून दुसरा आणि उमठा (ता. नरखेड) येथील भाऊसाहेब पवार यांच्या बैलजाेडीने ८.९३ सेकंदांत १०० मीटर अंतर पार करून तिसरा क्रमांक मिळवला.

डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, सतीश शिंदे, समीर उमप, राजू हरणे, महेंद्र गजबे, संदीप सरोदे, नरेश अरसडे, हंसराज गिरडकर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण साेहळा पार पडला. परीक्षकांनी दिलेल्या निर्णयावर कुणीही आक्षेप नाेंदविला नव्हता. यशस्वी आयाेजनासाठी शंकरपट कमिटीचे दशरथ हवाले, जगन्नाथ मेटांगळे, रमेश रेवतकर, सुरेश गोडबोले, रमेश जयस्वाल, मनोज गोडबोले, संजय कामडी, अजय घाडगे, मुकेश सावंत, प्रवीण वासाडे, सुरेश टेंभेकर, किसना नागापुरे, कुमार पल्हेरिया, रामराव हिरूडकर, बशीर पठाण, संदेश भांडवलकर, भय्या बेलखेडे, अनिकेत सावंत, पंकज मेटांगळे, समीर गोडबोले यांनी सहकार्य केले.

महिला धुरकरीची उणीव

या शंकरपटात मागील वर्षी सीमा श्रीराम महाले (रा. ज्ञानगंगापूर, ता. खामगाव, जिल्हा बुलढाणा) व शिवानी दिनेश मोहिते (१९, रा. सावरगाव, ता. नरखेड) या दाेघींनी धुरकरणीची भूमिका पार पाडल्याने दाेघीही आकर्षणाचे केंद्र ठरल्या हाेत्या. या वर्षी दाेघींसह इतर महिला धुरकरणी सहभागी हाेण्याची अनेकांना आशा हाेती. मात्र, एकही महिला धुरकरीण सहभागी न झाल्याने दर्शकांच्या पदरी निराशा पडली. या वर्षीही शंकरपटात नामवंत व देखण्या बैलजाेड्या सहभागी झाल्या हाेत्या.

या पटाची वैशिष्ट्ये

सावरगाव येथील शंकरपटाला सन १९५२ मध्ये सुरुवात करण्यात आली हाेती. न्यायालयीन बंदी व काेराेना काळ वगळता या शंकरपटाच्या आयाेजनात खंड पडला नाही, अशी माहिती शंकरपट कमिटीचे संयाेजक सतीश शिंदे यांनी दिली. शंकरपटाची पूर्वतयारी किमान दाेन महिने आधीपासून सुरू केली जाते. बैलजाेडीच्या धावण्याची वेळ माेजण्यासाठी स्वयंचलित सेकंद घड्याळ वापरले जात असून, चाकाेली ही १०० मीटरची असते. बैलजाेडीला पहिला आणि शेवटचा आडवा धागा ताेडणे अनिवार्य असते.

Web Title: The thrill of Shankarpata in Savargaon, 189 bullocks participated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.