नागपुरात पारा ९.४ अंशावर, ढगाळ वातावरणामुळे वाढेल विदर्भाचे तापमान, केव्हा कमी हाेईल गारठा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 19:53 IST2026-01-10T19:52:12+5:302026-01-10T19:53:43+5:30
Nagpur : दाेन दिवस १० अंशाच्यावर गेलेले उपराजधानीचे किमान तापमान पुन्हा खाली आले. शनिवारी नागपूरचे किमान तापमान ९.४ अंश नाेंदविण्यात आले. त्यामुळे गारेगार वातावरणाची अनुभूती नागपूरकर घेत आहेत.

The temperature is at 9.4 degrees in Nagpur, the temperature in Vidarbha will increase due to cloudy weather, when will the cold weather subside?
नागपूर : दाेन दिवस १० अंशाच्यावर गेलेले उपराजधानीचे किमान तापमान पुन्हा खाली आले. शनिवारी नागपूरचे किमान तापमान ९.४ अंश नाेंदविण्यात आले. त्यामुळे गारेगार वातावरणाची अनुभूती नागपूरकर घेत आहेत. विदर्भात गाेंदियाची नाेंदही सारखीच हाेती. मात्र ढगाळ वातावरणामुळे तापमान वाढेल व गारठा कमी हाेईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
नागपूरसह विदर्भाच्या काही शहरात थंडीचा कडाका कमी झालेला नाही. या आठवड्यात सीजनमधील सर्वात कमी तापमानाची नाेंद झाली आहे. गाेंदिया ७ व नागपूर ७.६ अंशाचे निचांकी तापमान नाेंदविले गेले. दुसऱ्या दिवशी ८ अंशाची नाेंद झाली. त्यानंतर दाेन दिवस पारा वाढून १० अंशाच्या पार गेला हाेता पण गारवा कायम हाेता. शनिवारी त्यात पुन्हा घसरण हाेत तापमान १० अंशाच्या खाली आले. नागपूरचा पारा ९.४ अंश सेल्सिअस नोंदवला गेला. त्यामुळे बाेचऱ्या थंडीची जाणीव नागरिकांना हाेत हाेती. त्यामुळे पहाटेच्या सुमारास शहराच्या बाह्य भागात धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. याशिवाय यवतमाळमध्ये पारा ९.८ अंश, भंडारा १० आणि गडचिराेली व वर्धा १०.६ अंशाची नाेंद झाली आहे. इतर शहरात पारा ११ अंशाच्यावर आहे. दिवसाचे तापमान २८.४ अंशाच्या सरासरीत स्थिर आहे, मात्र गार वाऱ्यामुळे वातावरणातील गारवा दिवसाही जाणवत आहे.
दरम्यान उत्तर भारतातून वाहणारी प्रत्यावर्ती चक्रीय वारा प्रणाली महाराष्ट्रावर सरकली असुन थंडी घेऊन येणारे थंड कोरडे पूर्वीय वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला आहे. त्या ऐवजी उलट बंगालच्या उपसागरातील आर्द्रता युक्त वारे मध्य भारताकडे फेकले जात आहेत. त्यामुळे येत्या २४ तासात ढगाळ वातावरण तयार हाेऊन तापमान २ ते ३ अंशाने वाढण्याची शक्यता आहे. हे वाढलेले तापमान पुढचे चार-पाच दिवस कायम राहणार, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे बाेचऱ्या थंडीपासून काही दिवस दिलासा मिळेल, अशी शक्यता आहे.
आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन
तापमानातील अचानक बदल व चढ उतारामुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी नागरिकांना कोमट पाणी पिण्याचा आणि उबदार कपडे वापरण्याचा सल्ला दिला आहे.