गरिबांच्या हक्काचे अन्न ओरबडून खात आहे भ्रष्ट यंत्रणा
By नरेश डोंगरे | Updated: October 14, 2025 20:30 IST2025-10-14T20:28:34+5:302025-10-14T20:30:56+5:30
भ्रष्टाचाऱ्यांच्या घशात कोट्यवधींची मलाई : गोरगरिबांच्या तक्रारी, ओरड होत आहे बेदखल

The corrupt system is eating away at the food that the poor deserve.
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरगरिबांना भुकेचे चटके बसू नये, त्यांच्या पोटाची खळगी भरण्यास त्यांना मदत व्हावी, या हेतूने सरकारकडून 'अंत्योदय तसेच प्राधान्य' योजनेअंतर्गत रेशन वितरित केले जाते. मात्र, हे वितरित करण्याची जबाबदारी असलेली भ्रष्ट यंत्रणा गरिबाच्या हक्काचा घास हिसकावून घेत आहे. या कल्याणकारी योजनेला दलालाच्या माध्यमातून उधळी लावून स्वत:च्या घशात मलाई कोंबत असल्याची संतापजनक माहिती पुढे आली आहे.
दैनंदिन जीवनासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या चहापासून साखरेपर्यंत आणि मीठ मिरचीपासून तर अन्नधान्यापर्यंतच्या प्रत्येक चीज वस्तूंची प्रचंड भाववाढ झाली आहे. परिणामी कष्टकरी जनता महागाईच्या आगीत अक्षरश: होरपळून निघत आहे. त्यांचे जगणे थोडेफार सुसह्य व्हावे म्हणून सरकार विविध योजना राबवितात. अशातीलच एक योजना म्हणजे प्राधान्य तसेच अंत्योदय योजना होय. या योजनेच्या माध्यमातून निराधार, वृद्ध, गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानांमार्फत महिन्याला रेशन दिले जाते. प्राधान्य योजनेअंतर्गत कार्ड धारकांना प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य (१ किलो गहू आणि ४ किलो तांदूळ) दिले जाते. अर्थात, ५ जणांचे कुटंब असेल तर एका कुटुंबाला महिन्याला २५ किलो धान्य मिळते. अंत्योदय योजनेअंतर्गत प्रतिकुटुंबाला ३५ किलो (१० किलो गहू आणि २५ किलो तांदूळ) धान्य दिले जाते. मात्र, ३० टक्के प्रामाणिक रेशन दुकानदार वगळता उर्वरित दुकानातून गरिबांना त्यांच्या हक्काचे रेशन कधीच पूर्णपणे मिळत नाही.
कार्डधारक आणि रेशन दुकानदार
संबंधित सूत्रांच्या नागपूर शहरात प्राधान्य योजनेचे ३७९२२९ तर अंत्योदय योजनेचे ४६,१६६ कार्डधारक आहेत. या सर्वांना त्यांच्या हक्काचे पूर्ण रेशन मिळावे आणि सार्वजिनक अन्नधान्य वितरण प्रणाली सुरळीत चालावी म्हणून सरकारने प्रत्येक शहरात त्याचे सुटसुटीकरण करून दिले आहे. नागपुरात धंतोली, मेडिकल, महाल, इतवारी, सदर आणि टेका अशी सहा झोन असून त्यात ६५० वर रेशन दुकानदार आहेत.
झारीतील शुक्राचार्य
रेशन कार्डधारक गरीब, निराधारांना धान्याचे वितरण करण्याची जबाबदारी शहरातील रेशन दुकानदारांवर आहे. त्यासाठी त्यांना आर्थिक मोबदलाही मिळतो. तर, या सर्वांवर नजर ठेवण्याची जबाबदारी अन्नधान्य पुरवठा विभागाची (एफडीओ) आहे. मात्र, या विभागातीलच काही भ्रष्ट मंडळी झारीतील शुक्राचार्य बनले आहेत. या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काही रेशन दुकानदारांना हाताशी धरून मापात माप मारून गोरगरिबांच्या हाता-तोंडातील घास हिसकावून घेण्याचा दुष्टपणा चालविल्याची चर्चा आहे.