रेल्वे गाड्यांमध्ये 'द बर्निंग ट्रेन'चे सापळे? पॅन्ट्रीकारच्या मॅनेजरकडून प्रतिबंधित साहित्यांचा वापर

By नरेश डोंगरे | Updated: July 26, 2025 20:03 IST2025-07-26T20:00:10+5:302025-07-26T20:03:40+5:30

हजारो प्रवाशांच्या जीवांशी खेळ : भुवनेश्वर एक्स्प्रेसमध्ये पॅन्ट्रीकार मॅनेजरकडून इलेक्ट्रॉनिक हिटरचा वापर

'The Burning Train' traps in railway trains? Pantry car manager uses banned substances | रेल्वे गाड्यांमध्ये 'द बर्निंग ट्रेन'चे सापळे? पॅन्ट्रीकारच्या मॅनेजरकडून प्रतिबंधित साहित्यांचा वापर

'The Burning Train' traps in railway trains? Pantry car manager uses banned substances

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
रेल्वे गाडीत आग लागून किंवा स्फोट होऊन हजारो प्रवाशांच्या जान-मालाला धोका होऊ शकतो, याची कल्पना असूनही अनेक 'पॅन्ट्री कार'चे मॅनेजर विविध रेल्वे गाड्यांमध्ये 'द बर्निंग ट्रेन'चे सापळे लावत आहेत. गेल्या तीन आठवड्यात अशा प्रकारची चार धक्कादायक उदाहरणे उजेडात आल्याने रेल्वे प्रशासनाला जबर हादरा बसला आहे.

रेल्वे गाड्यांत आग लागली किंवा स्फोट झाल्यास भयंकर आक्रित घडू शकते. अनेकदा तशा घटनांमधील भयावह दुष्परिणाम समोर आल्याने रेल्वे गाड्यांमध्ये पेट्रोल, डिजेल, रॉकेल, हिटर, स्टोव्ह, सिलिंडर, फटाके अथवा अशाच दुसऱ्या ज्वलनशील आणि स्फोटक पदार्थांच्या वापराला आणि वाहतुकीला प्रतिबंध आहे. असे साहित्य रेल्वेगाड्यांमधून कुणी नेऊ नये म्हणून सुरक्षा यंत्रणा सूक्ष्म नजर ठेवून असतात. कुणी सापडल्यास कडक कारवाई केली जाते. त्यामुळे अलिकडे प्रवासी तसा प्रयत्न करताना दिसत नाहीत. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून रोज हजारो रुपयांचा मलिदा लाटणारे काही 'पँट्रीकार मॅनेजर'च अशा साहित्याचा धावत्या ट्र्रेनमध्ये वापर करताना दिसतात आहेत. ४ जुलैला पोरबंदर हावडा एक्स्प्रेसच्या पँट्रीकारमध्ये (किचन) खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी प्रतिबंधित सिलिंडरचा वापर केला जात असल्याचे उघडकीस आले. आरपीएफने या प्रकरणी एकाला अटक केली. त्यानंतर ११ जुलैला एलटीटी भुवनेश्वर एक्स्प्रेसमध्ये पॅन्ट्रीकार मॅनेजर नागेंद्र शर्मा इलेक्ट्रॉनिक हिटरचा वापर करून खाद्यपदार्थ बनवत असल्याचे दिसून आला. २३ जुलैला आजाद हिंद एक्सप्रेस (पुणे–हावडा)मध्ये पॅन्ट्रीकारमधील कृष्णा शर्मा (वय २५ ) हा चहा तयार करण्यासाठी इमर्शन रॉडचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले. तर, हावडा सीएसएमटी मेलच्या पॅन्ट्रीकार मध्ये संतोषकुमार शर्मा (वय ३०) हा देखिल अशाच प्रतिबंधित उपकरणाचा वापर करताना आढळला.
 

हे तर ‘टिक-टिक बॉम्ब’
पॅन्ट्रीकारमध्ये ज्वलनशील तसेच उच्चदाबाच्या विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या वापरावर बंदी आहे. अशा उपकरणांचा वापर केल्यास शॉर्टसर्किट होऊन ट्रेनमध्ये आग लागण्याचा, स्फोट होण्याचा धोका असतो. एकीकडे घातपाताचे प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत असताना आता हा नवाच धोका पुढे आला आहे.

'' आगीचे धोके रोखण्यासाठी 'ऑपरेशन सुरक्षा' मोहिम सुरू करण्यात आली. त्यानुसार, रेल्वेगाड्यांच्या पॅन्ट्रीकारची तपासणी केली जात आहे.
-दीपचंद्र आर्य, सुरक्षा आयुक्त, आरपीएफ, नागपूर विभाग.

Web Title: 'The Burning Train' traps in railway trains? Pantry car manager uses banned substances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.