लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामाजिक न्याय विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरमधील अभ्यासिका आणि इतर सुविधा विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने उपलब्ध होत नसल्याच्या निषेधार्थ गुरूवारी विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले.
युवा ग्रॅज्युएट फोरमचे अतुल खोब्रागडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि मूलभूत सुविधा सुरळीत मिळाव्यात यासाठी मोठ्या संख्येने युवक-विद्यार्थी एकत्र आले होते.
विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप करत १५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या अभ्यासिकेत सर्व विद्यार्थ्यांना समान प्रवेश मिळावा, अभ्यासिकेसाठी निश्चित आणि परवडणारे दर जाहीर करून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबवावी, विद्यार्थ्यांवर लादण्यात येणाऱ्या अनावश्यक अटी व शर्ती तात्काळ रद्द कराव्यात, तसेच व्यवस्थापनातील कथित गैरप्रकारांवर त्वरित अंकुश आणावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या सुविधा, पारदर्शक व्यवस्थापन आणि न्याय्य शुल्कासाठी सुरू झालेला हा लढा पुढील काळात अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला असून, प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलनाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
या आंदोलनात अमित सवाई, संघपाल निकोसे, संघदीप बेलेकर, तन्मय वानखेडे, अभिजीत मेश्राम, आशिष संकाळे, आकाश रामटेके, विद्यानंद खोब्रागडे, आरजू कांबळे, राजन बागडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
व्यवस्थापक वासनिक यांना तातडीने पदावरून हटवा
आंदोलनादरम्यान कन्व्हेन्शन सेंटरचे व्यवस्थापन पाहणारे अतुल वासनिक यांना तात्काळ पदावरून दूर करण्याची ठाम मागणी करण्यात आली. त्यांच्या कामकाजातील त्रुटींमुळेच विद्यार्थ्यांना हा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यांच्या जागी सक्षम, पारदर्शक आणि विद्यार्थीकेंद्री अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी यावेळी जोरदारपणे मांडण्यात आली.
Web Summary : Students protested poor facilities at Nagpur's Ambedkar Convention Center, demanding fair access, affordable rates, and removal of manager Atul Wasnik. They threatened further action if demands aren't met.
Web Summary : नागपुर के आंबेडकर कन्वेंशन सेंटर में छात्रों ने खराब सुविधाओं का विरोध किया, उचित पहुंच, सस्ती दरों और प्रबंधक अतुल वासनिक को हटाने की मांग की। उन्होंने मांगें पूरी न होने पर आगे की कार्रवाई की धमकी दी।