वादळ जीवघेणे; पती-पत्नीचा डोक्यावर ‘टिन’ पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 11:42 AM2023-04-22T11:42:23+5:302023-04-22T11:43:43+5:30

न्यू मनीषनगरमधील घटना : वादळाच्या रौद्ररूपाने घेतले चार बळी

Storm turns fatal at Nagpur, Husband and wife died after tin shed fell on their heads | वादळ जीवघेणे; पती-पत्नीचा डोक्यावर ‘टिन’ पडून मृत्यू

वादळ जीवघेणे; पती-पत्नीचा डोक्यावर ‘टिन’ पडून मृत्यू

googlenewsNext

नागपूर : गुरुवारी आलेल्या वादळी पावसाने रौद्ररूप दाखविले व गोंडवाना चौकाजवळील जे. पी. हाइट्सच्या सुरक्षा भिंतीखाली दबून मायलेकांचा मृत्यू झाला होता, तर न्यू मनीषनगर परिसरात मूळचे छत्तीसगड येथील असलेल्या मजूर पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची बाबदेखील समोर आली आहे. या दाम्पत्याचा मृत्यू डोक्यावर घराचे ‘टिन’ पडून झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वादळासह आलेल्या अवकाळी पावसामुळे आतापर्यंत चारजणांचे बळी गेले आहेत.

गौरीलाल सुतूराम पटेल (३२) व रामला गौरीलाल पटेल (३१) अशी या दाम्पत्याची नावे आहेत. हे दोघेही मूळचे छत्तीसगड येथील बलोदा बाजार येथील सोलदा गावचे होते. नागपुरात ते काम करायचे. सांझविला, गुरुछाया सोसायटी, न्यू मनीषनगर येथे साइटचे काम सुरू होते. त्यांच्या झोपड्याला वरून ‘टिन’ लागले होते. मात्र सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ‘टिन’ हवेत उडाले व ते वेगाने खाली पडले. त्यावेळी दोघेही पती-पत्नी आतच होते. त्यांच्या डोक्यावरच ‘टिन’ पडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना जवळपासच्या नागरिकांनी तातडीने एम्स इस्पितळात उपचारासाठी नेले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

बेलतरोडी पोलिस ठाण्याचे एपीआय अनिल मेश्राम हेदेखील घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या परिसरात अनेक ठिकाणी बांधकाम सुरू असून, कामगार टिनाच्या झोपड्यांमध्येच राहतात. गुरुवारी आलेल्या वादळी पावसामुळे अनेकांच्या घराचे छत अशाच प्रकारे उडून गेले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पटेल यांच्या नातेवाइकांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

दोन मुले झाली पोरकी

मूळचे सोलदा येथील असलेले पटेल दाम्पत्य अतिशय हलाखीच्या परिस्थितीत राहत होते. त्यांना तीन ते पाच वर्षांची दोन मुले आहेत. मुलांचे भविष्य चांगले व्हावे व त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी यासाठीच दोघेही काळजावर दगड ठेवून नागपूरला आले होते. त्यांची मुले गावाकडेच होती. निसर्गाच्या तांडवाने अजाणत्या वयात त्यांचे आईवडील त्यांच्यापासून हिरावून घेतले आहेत. पटेल यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या सहकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Storm turns fatal at Nagpur, Husband and wife died after tin shed fell on their heads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.