सराफांचे व्यापाऱ्यांचे बंद आंदोलन मागे

By Admin | Updated: August 17, 2014 00:43 IST2014-08-17T00:43:58+5:302014-08-17T00:43:58+5:30

चोरट्याकडून सोने खरेदी केल्याचा आरोप असलेल्या चार सराफा व्यापाऱ्यांना शनिवारी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी बी.वाय. बोरकर यांनी जामीन मंजूर केला. पालकमंत्री नितीन राऊत आणि

Shutter traders turn back | सराफांचे व्यापाऱ्यांचे बंद आंदोलन मागे

सराफांचे व्यापाऱ्यांचे बंद आंदोलन मागे

चारही व्यापाऱ्यांना जामीन : गृहमंत्र्यांशी लवकरच चर्चा
नागपूर : चोरट्याकडून सोने खरेदी केल्याचा आरोप असलेल्या चार सराफा व्यापाऱ्यांना शनिवारी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी बी.वाय. बोरकर यांनी जामीन मंजूर केला. पालकमंत्री नितीन राऊत आणि सहआयुक्त अनुप कुमार यांच्याशी इतवारी सराफा बाजारात सायंकाळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर व्यापाऱ्यांनी बंद आंदोलन मागे घेतले आणि दुकाने उघडली.
चार दिवसाच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. व्यापाऱ्यांची बाजू मांडताना त्यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर न्यायाधीशांनी रिमांडची मागणी अमान्य केली. चार जणांवर पोलिसांनी नोंदविलेल्या सातही केसेसमध्ये प्रत्येकी १५ हजार रुपयांचा पीआर ब्रॉण्ड आणि १५०० रुपयांच्या कॅश सिक्युरिटीवर न्यायाधीशांनी जामीन मंजूर केला. या प्रकरणी ३० आॅगस्टला नियमित सुनावणी होणार आहे. याआधी न्यायालयाने चारही जणांना शनिवारपर्यंत पीसीआर दिला होता. अनुप उदापुरे (अशोक उदापुरे ज्वेलर्स, कॉटन मार्केट), मनीष पारेख (जे.डी. ज्वेलर्स, जुनी मंगळवारी), पुरुषोत्तम हेडावू (पुरुषोत्तम ज्वेलर्स, जुनी मंगळवारी) आणि अशोक मांजरे (अशोक मांजरे ज्वेलर्स) अशी जामीन मिळालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत.
पोलिसांनी चौकशी न करता चोरट्याच्या म्हणण्यावरून व्यापाऱ्यांच्या अटकेची कारवाई केल्याचा आरोप असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केला. अशा प्रकरणांमध्ये व्यापाऱ्यांच्या दक्षता समितीचा हस्तक्षेप राहील. पोलिसांच्या बळबजरीच्या विरोधात आमचा संघर्ष सुरूच राहील, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी न्यायालयात व्यापाऱ्यांची बाजू अ‍ॅड. प्रदीप सोनटक्के यांनी मांडली. त्यांना अ‍ॅड. मनोज कुल्लरवार आणि अ‍ॅड. आकाश जयस्वाल यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Shutter traders turn back