कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बोगसपणा उघड केल्याने आरटीआय कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 19:04 IST2025-10-17T19:03:07+5:302025-10-17T19:04:29+5:30
Nagpur : तहसील कार्यालयातील ऑपरेटर व रोहयो कर्मचारी धम्मा भारत भोयर आणि त्यांची पत्नी प्रीती धम्मा भोयर (रा. विरखंडी, ता. कुही) यांनी शेतकरी नसतानाही पीएम किसान योजनेचा लाभघेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

RTI activist receives death threat for exposing contractual employees' fraud
लोकमत न्यूज नेटवर्क
कुही : तहसील कार्यालयात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गैरप्रकारांचा पर्दाफाश केल्याने माहितीचा अधिकार महासंघाचे कार्यकर्ते डाकराम फेंडर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणातील संबंधितांवर कठोर कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी आयोजित पत्रपरिषदेत करण्यात आली. कुही तहसील कार्यालयात कंत्राटी पदावर कार्यरत असलेले ऑपरेटर धम्मा भारत भोयर यांनी तहसीलदारांच्या लॉगिन आयडीचा गैरवापर करून स्वतःच्या नावावर शेती नसतानाही पीएम किसान योजनेचा लाभ पती-पत्नी मिळून गेल्या काही महिन्यांपासून घेत असल्याचा प्रकार आरटीआय कार्यकर्ता डाकराम फेंडर यांनी उघडकीस आणला. यासंदर्भात त्यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी उमरेड आणि जिल्हाधिकारी नागपूर यांच्याकडे ११ सप्टेंबर २०२५ रोजी तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनंतर तहसीलदार डॉ. अमित घाटगे यांनी १७ सप्टेंबर रोजी धम्मा भोयर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर हे प्रकरण २९ सप्टेंबर रोजी कृषी अधिकारी राजेश जारोंडे यांच्याकडे चौकशीसाठी सुपूर्द करण्यात आले. मात्र, १४ दिवस उलटूनही चौकशी अहवाल तहसीलदारांकडे सादर न झाल्याने चौकशीमध्ये टोलवाटोलवी सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या ऑपरेटर व कृषी अधिकाऱ्यांमध्ये काही संगनमत तर नाही ना?" असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः विविध सरकारी कार्यालयांची पाहणी करत असताना, कुही तहसील कार्यालयातच शेतकऱ्यांच्या निधीवर डल्ला मारल्याचे प्रकरण उघड झाल्याने प्रशासनातील गैरप्रकार समोर येत आहेत.
तहसील कार्यालयातील ऑपरेटर व रोहयो कर्मचारी धम्मा भारत भोयर आणि त्यांची पत्नी प्रीती धम्मा भोयर (रा. विरखंडी, ता. कुही) यांनी शेतकरी नसतानाही पीएम किसान योजनेचा लाभघेतल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राप्त नोटिसीत धम्मा भोयर यांनी "माझ्या नावाची चुकीने नोंद झाली" असे नमूद केले आहे. मात्र, ही चूक नसून जाणूनबुजून केलेले कृत्य असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
रोहयो योजनेत ऑपरेटर पदावर कार्यरत असलेल्या धम्मा भोयर यांनी एकूण तीन जॉब काईस काढल्याचेही आढळून आले आहे. तसेच त्यांच्या पत्नी प्रीती भोयर या ग्रामपंचायत विरखंडी व हरदोली राजा येथे ऑपरेटर असूनही त्यांच्या नावाने मजूरदार म्हणून मस्टर तयार करण्यात आला आहे. या अनियमिततेनंतर त्यांनी जुने जॉब कार्ड रिजेक्ट करून त्याच दिवशी नवीन कार्ड तयार केले, अशी माहिती ग्रामपंचायतला दिलीच नाही. तक्रारीनंतर आरटीआय कार्यकर्ता डाकराम फेंडर यांना ३ ऑक्टोबर रोजी मोबाइलवरून धमकी देण्यात आली. या घटनेवरून फेंडर यांनी कुही पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी भा.न्या.सं. कलम ३५१ (२) नुसार अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.