पोलीस स्टेशनजवळ ट्रेलरची मोटारसायकलला धडक; चालकाचा मृत्यू, एक जखमी
By योगेश पांडे | Updated: February 20, 2023 17:58 IST2023-02-20T17:55:21+5:302023-02-20T17:58:36+5:30
ट्रेलरचालक घटनास्थळावरून ट्रेलर सोडून फरार

पोलीस स्टेशनजवळ ट्रेलरची मोटारसायकलला धडक; चालकाचा मृत्यू, एक जखमी
नागपूर : भरधाव ट्रेलरने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. पारडी पोलीस ठाण्याच्या जवळच हा अपघात झाला.
हिमांशू अशोक गजभिये (२५, पांढराबोडी, अंबाझरी) असे मृतकाचे नाव आहे. तो धीरज मनोहर दहीकरसोबत एका कंपनीत ‘कलेक्शन’चे काम करत होता. रविवारी दोघेही कामानिमित्त भंडारा येथे गेले होते. काम आटोपून रात्री साडेदहाच्या सुमारास ते परत येत असताना पारडी पोलीस ठाण्यासमोरील पंपजवळ हिमांशूच्या मोटारसायकलला मागून येणाऱ्या एमएच४०-बीजी-११६५ या ट्रेलरने धडक दिली. यात मोटारसायकलवरील ताबा जाऊन हिमांशू ट्रेलरच्या मागील चाकात येऊन गंभीर जखमी झाला. धीरजदेखील जखमी झाले.
आवाज ऐकून सर्वजण घटनास्थळाकडे धावले व जखमींना तातडीने मेयो इस्पितळात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी हिमांशूला तपासून मृत घोषित केले. या अपघातानंतर ट्रेलरचालक घटनास्थळावरून ट्रेलर सोडून फरार झाला. धीरजच्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.