महसूलमंत्री बावनकुळेंची भूमिका, शालार्थ घोटाळ्यातील शाळा संचालकांची मालमत्ता जप्त करा
By योगेश पांडे | Updated: August 18, 2025 18:28 IST2025-08-18T18:28:13+5:302025-08-18T18:28:59+5:30
ज्या शाळा संचालकांनी बदमाशी केली आहे, त्यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे : शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी सविस्तर चर्चा

Revenue Minister Bawankule's stance: Seize the assets of school directors involved in the Shalarth scam
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यभरात गाजत असलेल्या बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात महसूलमंत्री व नागपुरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका मंडली आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यात शिक्षकांचा काही दोष नाही. मात्र ज्या शाळा संचालकांनी बदमाशी केली आहे, त्यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे असे त्यांनी निर्देश दिले आहेत. या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
सोमवारी नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शाळा संचालकांनी शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या आधी त्यांना प्रलोभन देत खोट्या पद्धतीने शालार्थ आयडी तयार केले आणि त्यांची नियुक्ती केली आहे. अनेक शिक्षकांनी तर नोकरीसाठी कर्ज घेतले आहे. मात्र शाळा संचालकांनी गैरव्यवहार केले आहेत. त्यात शिक्षकांचा काहीही दोष नाही. शासन त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासोबत चर्चा करून ठोस तोडगा काढला जाईल. उलट ज्या शाळा संचालकांनी बदमाशी केली आहे त्यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे. या संदर्भात पुन्हा एकदा शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या सोबत चर्चा केली जाईल असेही बावनकुळे म्हणाले.
पूरग्रस्त भागात तातडीची मदत
राज्यात विविध ठिकाणी निर्माण झालेल्या पूरस्थितीवर राज्य सरकार सर्वतोपरी लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरू आहे. ज्या भागात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे, त्या ठिकाणी सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. पंचनामे सुरू असून जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय मुंबईतील वॉर रूम मधून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून आवश्यक तातडीची मदत पोहोचवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.